ALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय जाहिरात / ADVT शैक्षणिक वृत्तान्त/लेख मुलाखत शासकीय योजना मनोरंजन क्रीडा शेती/शेतकरी
महिला पोलीस कर्मचाऱ्यांची कॅन्सरविषयक नियमित तपासणी....गायनोकॉलॉजिस्ट सोसायटीच्या सहकार्याने करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना 
March 9, 2020 • गोरख तावरे • ताज्या बातम्या

महिला पोलीस कर्मचाऱ्यांची कॅन्सरविषयक नियमित तपासणी....गायनोकॉलॉजिस्ट सोसायटीच्या सहकार्याने करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना 

 मुंबई - पोलीस दलातील महिला अधिकारी व कर्मचारी यांच्या चांगल्या आरोग्याच्या दृष्टीने नियमित तपासणी विशेषत: सर्व प्रकारच्या कॅन्सरची तपासणी करण्यासाठी स्त्री रोग तज्ज्ञांच्या ‘फेडरेशन ऑफ गायनोकॉलॉजिस्ट सोसायटी ऑफ इंडिया’च्या (फॉग्जी) समन्वयाने कार्यक्रम हाती घेण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संबंधिताना सूचना दिल्या आहेत.

पुरंदरे हॉस्पिटल (चर्नी रोड) येथे आज या आरोग्य तपासणी उपक्रमाचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास  खारगे यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी फॉग्जीचे माजी अध्यक्ष डॉ. सी. एन. पुरंदरे, महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष डॉ. जयदीप टांक यांच्यासह फॉग्जीचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

आज जागतिक महिला दिनानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रातून तसेच फॉग्जीच्या मुंबई, ठाणे, भाईंदर शाखेने मिळून सुमारे 25 हजार महिला पोलीस कर्मचाऱ्यांची तसेच राज्य राखीव दलातील महिला पोलिसांची कॅन्सरविषयक तपासणी केली.

  महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या आरोग्य तपासणीचा हा उपक्रम राबविण्याची कल्पना फॉग्जीचे अध्यक्ष अल्पेश गांधी यांची असून राज्यातील 33 शाखांमधून पोलीस महिला कर्मचाऱ्यांची आरोग्य विषयक तपासणी आणि कॅन्सरपासून कसा प्रतिबंध करायचा यावर त्यांना मार्गदर्शन असे कार्यक्रम घेण्यात आले अशी माहिती महाराष्ट्राच्या संघटक डॉ. गिरीजा वाघ यांनी दिली.  फॉग्जीच्या देशभरातील 300 सदस्य संस्थापैकी 230 संस्थानी त्यांच्या भागात ही शिबिरे विनामूल्य आयोजित केली होती.    

महिलांमधील स्तनाचा कर्करोग होण्याचे प्रमाण वाढत असून गर्भाशयाचा तसेच इतर प्रकारचे कर्करोग वाढत आहेत. पोलीस दलातील महिलांना कर्तव्याच्या स्वरुपामुळे आरोग्याची काळजी घेताना अडचणी येतात. त्यामुळे त्यांच्यासाठी खास अशा प्रकारे नियमित तपासणी करण्याचा उपक्रम राज्य शासन फॉग्जीच्या सहकार्याने करू शकते का ते पाहण्याच्या सूचना देऊन या उपक्रमास मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी यावेळी सांगीतले.

मुख्यमंत्र्यांनी या उपक्रमाबद्दल ‘फॉग्जी’चे पदाधिकारी तसेच पोलीस महासंचालक सुबोध कुमार जयस्वाल, मुंबईचे पोलीस आयुक्त परम बीर सिंह यांच्यासह राज्यातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांचे कौतुक करुन शुभेच्छा दिल्या आहेत.

कार्यक्रमास फॉग्जीचे सचिव डॉ. माधुरी पटेल, पदाधिकारी डॉ. सुवर्णा खाडिलकर, डॉ. सरिता भालेराव, डॉ. कोमल चव्हाण, डॉ. परीक्षित टांक ,डॉ. अनुजा पुरंदरे, डॉ. शेखर पुरंदरे, डॉ. सुजाता दळवी आदींची उपस्थिती होती.