मसूर येथील गरजू कुटुंबाना अन्नधान्याच्या किटचे वाटप
कराड - ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने जिल्ह्यातील गरजू कुटुंबांना जीवनावश्यक अन्नधान्याच्या किटचे वाटप करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.नामदार बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते मसूर ता.कराड येथील गरजू कुटुंबाना अन्नधान्याच्या किटचे वाटप करण्यात आले.
‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे मजूर, स्थलांतरित कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांनी सामाजिक भावनेतून या नागरिकांची जबाबदारी घेण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार जिल्ह्यामधील स्थलांतरित, तसेच मोलमजुरी करणारे मजूर व गरजू कुटुंबांना त्यांच्या दैनंदिन उदरनिर्वाहासाठी अन्नधान्याचे कीट उपलब्ध करून देण्याचा निर्णय बँकेने घेतला आहे. त्यात तेल, तांदूळ, साखर, चटणी, हळद, गहू, आटा इत्यादी वस्तूंचा समावेश केला आहे.
त्याचबरोबर मसूर व परिसरातील लोकांची पल्स ऑक्सिमिटरच्या साहायाने आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. यावेळी सातारा जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ समिती सभापती मानसिंगराव जगदाळे, बी.डी.ओ.आबासो पवार, डॉ.रमेश लोखंडे, ए.पी.आय. अजय गोरड, मसुरचे सरपंच पंकज दीक्षित, सातारा जिल्हा बँक डी.डी.ओ.विश्वास गणेशकर उपस्थित होते.