कराडमध्ये बाहेरून येणाऱ्या नागरिकांची माहिती प्रशासनाला द्यावी..मुख्याधिकारी यशवंत डांगे यांचे आवाहन


कराडमध्ये बाहेरून येणाऱ्या नागरिकांची माहिती प्रशासनाला द्यावी..मुख्याधिकारी यशवंत डांगे यांचे आवाहन


कराड : कराड शहरात मोठ्या प्रमाणात मुंबई, पुणे,तसेच परराज्य आणि परदेशातून भूमिपुत्र, नोकरदार, विद्यार्थी रितसर परवानगी घेऊन येत आहेत. सातारा जिल्ह्यातील सहा चेक पोस्ट वरती हातावर शिक्के मारले जात आहेत. त्यांना घरात राहण्याच्या सक्त सूचना आहेत. या सूचनांचे पालन संबंधितांनी करावे असे आवाहन कराड नगरपालिकेचे मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी केले आहे.


सर्व नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते,कर्मचारी, मुकादम यांनी कराड शहरातील प्रत्येक प्रभाग, गल्ली, पेठेमध्ये येणाऱ्या कराडकर यांची नोंद ठेवण्याच्या दृष्टीने दक्षता घ्यावी. यामुळे कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढणार नाही यादृष्टीने सामुदायिक प्रयत्न करणे आवश्यक आहे.


कराडमध्ये येणारे सर्व कराडकर दक्षता घेतील परंतु सहज प्रवृत्ती म्हणून पाय मोकळे करणे, यासाठी नातेवाईक, मित्र शेजारी यांच्याकडे भेटीसाठी जातात. नगरपालिकेकडे येणारी यादी सातारा जिल्हाची एकत्रित यादी येत आहे. नगरपालिकास्तरावर छाननी करून मुकादम, स्थानिक कर्मचारी त्यांचे समुपदेशन करीत आहेत.


दरम्यान कराड नगरपालिका प्रशासनाच्या वतीने विनंती आणि आवाहन करण्यात येत आहे की, आपल्या परिसरात बाहेरून येणाऱ्या नागरिकांच्यावर लक्ष ठेवण्याची गरज आहे.
प्रशासनाला, स्थानिक नगरपालिका कर्मचारी, नगरसेवक यांना माहिती तात्काळ द्यावी. दापोली शहरात मुंबईमधून एका दिवसात 1800 लोक आले आहेत. त्यातील एकाला विलिनीकरण कक्षात ठेवले आणि त्याच्यामुळे इतरही बाधित झाले. अशा घटना घडत आहेत. यामुळे काळजी करण्यासारखी परिस्थिती आहे. कदाचित टाळेबंदी अजून वाढण्याची शक्यता आहे. येथून पुढील 15 दिवस बाहेरून आलेल्या नागरिकांवरती लक्ष ठेवावे लागेल. जेणेकरून कोरोना संसर्ग कमी होण्यास मदत होईल."मीच माझा रक्षक" म्हणून आजपासून काम करावे लागेल. यासाठी सर्वांनी आपले योगदान द्यावे असे आवाहनही नगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.