मुस्लीम बांधवांनी घरातच नमाज पठन करावे : प्रांताधिकारी मिनाज मुल्ला
सातारा : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव व जारी असलेले प्रतिबंधात्मक आदेश व लॉकडाऊनची नियमावली या पार्श्वभूमीवर मुस्लीम बांधवांनी रमजान ईद शांतेत पार पाडावी. तसेच ईदगाह, मशीद अथवा सार्वजनिक ठिकाणी नमाज न पठन करता घरातच नमाज पठन करावे. नमाज पठन करता वेळी सोशल डिस्टन्सिंग राहील याची काळजी घ्यावी, असे आवाहन सातारचे प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांनी केले आहे.
शांतता कमिटीची बैठक आज प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला सहायक पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्यासह ग्रामीण व शहरी भागातील मुस्लीम बांधव उपस्थित होते.
रमजान ईद हा सण साजरा करत असताना शासनाने कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ज्या अटी व शर्ती दिलेल्या आहे त्याचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच जिल्ह्यात क्रिमीनल प्रोसिजर कोड 1973 चे कलम 144 लागू करण्यात आले आहे त्याचाही भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचनाही प्रांताधिकार मिनाज मुल्ला यांनी केल्या.
कोरोनाचा प्रादुर्भाव प्रतिबंधित करण्यासाठी प्रतिकारक्षमता कशी वाढवावी, याची माहितीही उपस्थित मुस्लीम बांधवांना या बैठकीत देण्यात आली.