कोरोनाबाबत कराड तालुक्याच्या एका डोळ्यात हसू तर दुसऱ्या डोळ्यात आसू
(गोरख तावरे)
कराड तालुक्याला लागलेले कोरोनाचे ग्रहण सुटता सुटेना झाले आहे.एकाबाजूला कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढते आहे. तर दुसर्या बाजूला कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतत आहेत. अशी परिस्थिती सध्या कराड तालुक्यात दिसून येत आहे. एका डोळ्यात "हसू" तर एका डोळ्यात "आसू" असा प्रकार दिसून येत आहे.आज दिवसभरामध्ये कोरोना बाधित तीन रुग्ण आढळले तर दोन रुग्णांना कृष्णा हॉस्पिटलमधून टाळ्यांचा कडकडाट करीत घरी सोडण्यात आले आहे.
सातारा जिल्हा रेड झोनमध्ये असून कराडसह 13 गावांमध्ये कंटेनमेंट झोन जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केला आहे. यामुळे या 13 गावांमध्ये सर्व बंद आहे. जीवनावश्यक वस्तू व मेडिकलमधील औषधे ही प्रत्येक ग्राहकांना घरपोच देण्याची व्यवस्था प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. या वस्तू खरेदीसाठी नागरिकांनी घराबाहेर पडू नये. असे सक्त आदेश प्रशासनाने केले आहे. दरम्यान किराणामाल, भाजीपाला, मेडिकल दुकाने सुरू करण्यास प्रतिबंध करण्यात आला असून नागरिकांच्या मागणीनुसार ऑनलाइन अथवा व्हाट्सअपवर यादी घेऊन या नागरिकांना त्यांच्या मागणीनुसार घरपोच सेवा द्यावी यासाठी प्रशासनाच्यावतीने नियोजन करण्यात आले आहे.
कराडमध्ये एक सकारात्मक बातमी येते तर दुसरी नकारात्मक बातम्यांचा ओघ सुरुच आहे.एक दिवस आनंदात जातो तर दुसऱ्या दिवशी पुन्हा कोरोना बाधित रुग्णांची संख्या पाहिली की सर्व कसे चिडीचूप होते. एखाद्या दिवशी कोरोना बाधित रुग्णांची संख्या नाही, हे पाहिल्यानंतर आनंद होतो. तर दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा कोरोना रुग्ण आढळतो.कृष्णा हॉस्पिटलमधून टाळ्यांचा कडकडाट करीत बाधित रुग्ण ठणठणीत बरा होऊन, त्याला घरी सोडले जाते. यावेळी कृष्णा हॉस्पिटलच्या सेवकांबरोबरच संपूर्ण कराड तालुक्याला आनंद होतो. दरम्यान हा आनंदाचा क्षण फार काळ राहत नाही, त्यावर विरजण पडते.
दोन कोरोनामुक्त पेशंट्सना डिस्चार्ज देण्याची आनंदवार्ता देण्यापाठोपाठ आणखी एक रुग्ण कोरोना बाधित आल्याने,कही खुशी कही गम अशी अवस्था. कराड येथील दोन नागरिक बाधित तर 171 नागरिकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आलेले आहेत. आता सातारा जिल्ह्यात 69 रुग्ण कोरोना बाधित असून आतापर्यंत 9 (कोविड 19) मुक्त होऊन रुग्णालयातून सोडले आहेत. तर 2 जणांचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात एकूण 80 बाधित रुग्ण आढळले आहेत. आज एका दिवसांमध्ये एकूण 171 जणांचे अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत. दरम्यान 293 जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आलेले आहे.
क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे 66, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे 75 व बाधित रुग्णांचे 14 दिवसानंतर नमुने 10 असे एकूण 85, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड 90, उपजिल्हा रुग्णालय, फलटण 26 व ग्रामीण रुग्णालय, कोरेगाव 26 असे एकूण 293 जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. कराड तालुका हॉटस्पॉट म्हणून ओळखला जात आहे. कारण या ठिकाणी सातत्याने कोरोना बाधित रुग्ण आढळत आहेत.दरम्यान दुसर्या बाजूला कोरोना आबाधित असणारे रुग्ण बरे होऊन सुद्धा आपल्या घरी जातात. ही महत्त्वाची बाब अधोरेखित केली पाहिजे.