राज्यपालांना आता मंत्रिमंडळाचं ऐकावं लागेल : पृथ्वीराज चव्हाण


राज्यपालांना आता मंत्रिमंडळाचं ऐकावं लागेल : पृथ्वीराज चव्हाण


कराड : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीबाबत राजकारण होत आहे. यात काही शंका नाही. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यासाठी त्यांचा अधिकार वापरला, आता त्यांना मंत्रिमंडळाचं ऐकावं लागेल, असं स्पष्ट मत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलं आहे. युवक काँग्रेसच्या वेब सेमिनारमध्ये ते बोलत होते.


भारतीय राज्यघटनेप्रमाणे एकदा मंत्रिमंडळ अस्तित्वात आले की मग, मंत्रिमंडळाचा अधिकार हा सर्वोच्च असतो. राज्यपालांनी मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच राज्य करायचे असते, त्यांना मंत्रिमंडळाचा सल्ला मान्य करावा लागतो. मंत्रिमंडळ गठन व्हायच्या आत, कोणाला मुख्यमंत्री करायचे, याचे राज्यपालांकडे भरपूर स्वेच्छाधिकार असतात. तो यावेळी वापरलाही गेला. म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचे केवळ 80 तासांचे सरकार झाले. परंतु एकदा सरकार अस्तित्वात आले, उद्धव ठाकरे यांचे सरकार अस्तित्वात आलेले आहे. की त्या मंत्रिमंडळाने दिलेला सल्ला, किंवा त्यांनी दिलेला जो निर्णय असेल, शिफारस असेल, ती राज्यपालांना मान्यच करावी लागेल, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.


आपल्या राज्यघटनेप्रमाणे राज्यपाल 12 जणांना मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने विधानपरिषदेवर नियुक्त करतात. मी मुख्यमंत्री असताना 2014 मध्ये 12 जणांना आमदार म्हणून विधानपरिषदेवर नियुक्त केलं होते. त्याची मुदत 6 जून 2020 रोजी संपणार आहे, असं चव्हाण यांनी सांगितलं.