लॉक डाऊनचे निर्बंध शिथिल करणे नागरिकांच्याच हातात....आ. शिवेंद्रसिंहराजे


लॉक डाऊनचे निर्बंध शिथिल करणे नागरिकांच्याच हातात....आ. शिवेंद्रसिंहराजे


सातारा- कोरोना महामारीला आळा घालण्यासाठी काळाची गरज ओळखून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉक डाऊनचा कालावधी ३ मे पर्यंत वाढवला आहे. दरम्यान, कोरोना प्रादुर्भावाची परिस्थिती पाहून त्या- त्या भागात लॉक डाऊनबाबतचे निर्बंध शिथिल करण्याचे संकेतही पंतप्रधान मोदी यांनी दिले आहेत. त्यामुळे आपल्या सातारा जिल्ह्यातील लॉक डाऊनचे निर्बंध शिथिल करणे हे सर्वस्वी नागरिकांच्याच हातात आहे. सातारकरांनी आणि तमाम जिल्हावासियांनी आपल्या जिल्ह्यातून कोरोनाला हद्दपार करण्यासाठी कोरोनाविरोधातील लढा अधिक तीव्र करावा, घरात राहून कोरोनाला हरवण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले आहे. 

 

जगावर ओढवलेल्या महाभयंकर कोरोनाच्या संकटामुळे आपल्या देशातही हाहाकार उडाला आहे. आपल्या देशातून कोरोना साथीला आळा घालण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील लॉक डाऊनचा कालावधी दि. ३ मे पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला. लॉक डाऊनमुळे अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्वप्रकारची दुकाने, कार्यालये बंद असल्याने जनजीवन विस्कळीत झाले असले तरी कोरोनापासून बचाव करण्यासाठी लॉक डाऊन हाच एकमेव पर्याय आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या घरातच राहून आपले आणि कुटुंबाचे कोरोनापासून रक्षण करणे आवश्यक आहे. दरम्यान, लॉक डाऊनची मुदत वाढवतानाच पंतप्रधान मोदी यांनी दि. २० एप्रिल पर्यंतची प्रत्येक भागातील परिस्थिती पाहून लॉक डाऊनमधील निर्बंध शिथिल करण्याचे संकेतही दिले आहेत. आपल्या जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वोतोपरी प्रयत्न करत असून लॉक डाऊनची काटेकोरपणे अंमलबजावणी करत आहे. त्याला नागरिकांनी साथ देणे अत्यावश्यक आहे. कोणीही विनाकारण घराबाहेर पडल्यास कोरोनाला निमंत्रण मिळू शकते, हे होऊ नये यासाठीच लॉक डाऊन हा प्रभावी पर्याय पंतप्रधानांनी निवडला आहे. 

 

स्वतःचे कोरोनापासून रक्षण करायचे असेल तर घरातून बाहेर न पडणे हाच एकमेव उपाय आहे. तरच कोरोनाची साथ आटोक्यात येईल आणि स्वतःचे व इतरांचे या साथीपासून संरक्षण होईल. लॉक डाऊनमध्ये कोणीही बाहेर न पडल्यास आपल्या जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात येईल, यासाठी कोरोनाविरोधातील लढा अधिक तीव्र करणे आवश्यक आहे. म्हणजेच कोणीही घराबाहेर पडणार नाही, प्रशासनाला सहकार्य करेल तर आणि तरच आपण कोरोनाला हरवू शकतो. आणि असे झाले तरच पंतप्रधानांनी दिलेल्या संकेतानुसार आपल्या जिल्ह्यातील लॉक डाऊनचे निर्बंध दि. २० एप्रिल रोजी शिथिल करण्याबाबत सकारत्मक निर्णय होईल आणि रोजंदारी व मजुरी करणारे, गोरगरीब, गरजू लोकांसह सर्वानांच दिलासा मिळेल. त्यामुळे कोरोनासारख्या भयावह महामारीला आळा घालून जनजीवन पूर्वपदावर आणायचे असेल तर सर्वांनी लॉक डाऊनचे काटेकोर पालन करावे, कोणीही विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी नागरिकांना केले आहे. 

 

पुणे मुंबईकरांनी प्रशासनाला सहकार्य करावे 

 

पुणे, मुंबईतील आणि परगावाहून जिल्ह्यात आलेल्या नागरिकांनी घाबरून जाण्याचे काहीही कारण नाही. अनेक रुग्ण कोरोनाला हरवून त्यांच्या घरी परतल्याचे आपण पहात आहोत. त्यामुळे बाहेरून आलेल्या नागरिकांनी घाबरण्याचे काहीही कारण नाही. फक्त कोरोनापासून स्वतःचा आणि इतरांचा बचाव करण्यासाठी त्यांनी प्रशासनाला, महसूल विभाग अथवा आरोग्य विभागाला माहिती देणे आवश्यक आहे. कोणीही माहिती लपवू नये. असे करून आपण स्वतःचे आणि गावातील प्रत्येकाचे नुकसान करत आहोत. घाबरून अथवा माहिती लपवून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका अधिक संभवतो. त्यामुळे अशा लोकांनी आणि खास करून लक्षणे आढळणाऱ्या लोकांनी स्वतःहून प्रशासनाला माहिती द्यावी आणि कोरोना विरोधातील लढा अधिक तीव्र करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी केले आहे.