पत्रकारीतेचा "घेतला वसा" म्हणून काम करणे महागात पडू शकते... पत्रकार व वृत्तपत्र विक्रेत्यांच्या सुरक्षेचे काय ?
मुंबईतील 53 पत्रकारांना कोरोनाची लागण झाली आहे. ही पत्रकारांच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे. दरम्यान लॉकडाऊन पासून महाराष्ट्रातील मराठीसह इतर भाषेतील वृत्तपत्र बंद आहेत.राज्य सरकारने वृत्तपत्र सुरू करण्यास परवानगी दिली मात्र वितरण करण्यास बंदी घातली. याबाबत महाराष्ट्रातील अनेक संघटनांनी आरडाओरड केली. अखेर राज्य सरकारने अंक विक्री करण्यास परवानगी दिली आहे. "आम्ही लढाई जिंकली" अशी काही पत्रकार संघटना पोस्ट करून स्वतःची पाठ थोपटून घेत आहेत. आमचा प्रश्न सर्व पत्रकार संघटना एकच आहे की, जे कोरोना बाधित 53 पत्रकार आहेत. त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ज्या वृत्तपत्रात अथवा न्यूज चॅनेलला हे पत्रकार काम करतात, त्याची जबाबदारी मालकांनी घेतली आहे काय ? वास्तविक मीडिया, वृत्तपत्र म्हणजे लोकशाहीचा चौथास्तंभ म्हणून उल्लेख होतो.कायदेशीर दृष्ट्या या चौथास्तंभाला कोणतेही संरक्षण नाही. कारण जे लोकशाहीचे इतर स्तंभ आहेत त्यांना घटनेने, कायद्याने सर्व अधिकार बहाल केले आहेत. चौथ्यास्तंभाला असेच मोकळे सोडले आहे. याचा कधीतरी गंभीरपणे विचार झाला पाहिजे.
महाराष्ट्रातील मराठी पत्रकार जीवावर उदार होऊन अनेक धोकादायक व कठीण प्रसंगात पत्रकारिता करतात. जीवाची, कुटुंबाची पर्वा काळजी करीत नाहीत. हा इतिहास आहे. सध्या 53 पत्रकारांना झालेला कोरोना पाहता पुन्हा एकदा हे अधोरेखित झाले आहे.वृत्तपत्र, न्यूज चॅनेलमध्ये तुटपुंज्या मानधनावर पत्रकारांचा सर्रास वापर करून घेतला जातो. त्यांना अधिकचे मानधन अथवा केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या आयोगाप्रमाणे वेतन दिले जात नाही. गंमतीचा भाग म्हणजे हेच पत्रकार समाजातील विविध अन्यायाच्या विरोधात प्रचंड काम करतात आणि स्वतःवरच्या अन्यायाबाबत "ब्र" शब्द न उच्चारता सर्व सहन करतात. हा विरोधाभास केव्हा संपणार ? असा खरा प्रश्न आहे. पत्रकारांच्यावर हल्ले होतात. पत्रकारांचा शेवट दुर्दशापूर्ण होतो. पत्रकार हा पत्रकारिता क्षेत्रातून बाहेर गेला की, त्याचे प्रचंड हाल होतात. ही वस्तुस्थिती कोणताही पत्रकार, वृत्तपत्राचे मालक, न्यूज चॅनेलचे मालक नाकारणार नाहीत. मात्र याबाबत सुयोग, चांगला मार्ग काढून पत्रकारांचे जीवन सुसह्य करण्याचा कोणीही प्रयत्न करीत नाही. ही वस्तुस्थिती माहीत असतानाही याबाबत सर्व मुग गिळून गप्प आहेत.
वृत्तपत्र वाटप करण्याला शासनाने परवानगी द्यावी यासाठी पत्रकार संघटनांनी प्रयत्न केला आणि राज्य शासनाने वृत्तपत्र वितरणाला परवानगी दिली आहे. वृत्तपत्र विक्रेते पोटापाण्यासाठी हा व्यवसाय करतात. दरम्यान "कोरोना" सारख्या महाभयंकर महामारीमध्ये वृत्तपत्र वाटप करणे योग्य आहे का ? वृत्तपत्र विक्रेत्यांच्या जीवितास धोका निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी कोण स्वीकारणार ? वृत्तपत्राचे मालक पत्रकारांची हमी घेत नाहीत. मग वृत्तपत्र विक्रेत्यांची हमी कोण घेणार ? वृत्तपत्र विक्री करण्यासाठी पत्रकार संघटनांनी प्रयत्न केला. आम्हाला यात यश आले. हे म्हणणे ठीक आहे. मात्र हातावर पोट असणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांना महामारीमध्ये ढकलणे योग्य आहे का ? कारण वृत्तपत्र विक्री करताना अनेक लोकांचा रोज संपर्क येणार. वास्तविक पाहता कोरोना संसर्ग टाळण्यासाठी इतरांचा संपर्क न येणे, हा सध्यातरी उपाय आहे. याउलट पत्रकार संघटना म्हणताहेत वृत्तपत्र विक्री करण्यासाठी वृत्तपत्र विक्रेत्यांनी घरोघर फिरावे.वृत्तपत्र विक्रेते यांच्याबाबत झालेला निर्णय योग्य का अयोग्य ? हे आता वृत्तपत्रांच्या मालकाबरोबर पत्रकार संघटनांनी ठरवावे.
कोरोना व्हायरसच्या महामारीचे संकट परतवून लावण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने लॉकडाऊन केले आहे. या काळात अनेकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ही वस्तुस्थिती असली तरी, याशिवाय दुसरा मार्ग नाही. इतर उद्योगाबरोबरच वृत्तपत्र व्यवसाय अडचणीत आला आहे. वृत्तपत्र व्यवसाय टिकेल की नाही, अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.लॉकडाऊनच्या काळामध्ये वृत्तपत्र प्रिंट करून ते वाचकांपर्यंत देणे हे वृत्तपत्राच्या मालक व व्यवस्थापनाला परवडत नाही. कारण कोणत्याही प्रकारची वृत्तपत्रांमध्ये सध्या जाहिरात नाहीत. प्रिंट मीडिया राहील की नाही ? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. हे सत्य आता स्वीकारावे लागेल. ईपेपर व वेबसाईटद्वारे सोशल मीडियावर जलद गतीने वाचकांच्यापर्यंत बातम्या, विश्लेषण, लेख पोचविले जात आहे. हे सर्व मोफत दिले जात असल्यामुळे यामध्ये काम करणाऱ्या पत्रकारांना आर्थिक लाभ कसा मिळणार ? पत्रकारांचा उदरनिर्वाह कसा होणार ? यासह अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
वास्तविक पाहता नकारात्मक विचार येथे मांडण्याचा कोणताही हेतू नाही. सकारात्मक विचार करून कठीण प्रसंगातून अनेक वेळेला प्रिंट मीडिया टिकाव धरून राहिली आहे. "हेही दिवस जातील" असे म्हणून येणाऱ्या परिस्थितीला प्रिंट मीडियाला सामोरे जावेच लागेल. दरम्यान सध्याच्या महामारीच्या काळामध्ये पत्रकारिता क्षेत्रांमध्ये प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडियामध्ये काम करणाऱ्या पत्रकारांनी स्वतःच्या जीविताची काळजी घेतली पाहिजे. कारण मुंबईमध्ये 53 पत्रकार कोरोना बाधित झाले आहेत. हेच मुळात पत्रकारांना विचार करण्यासाठी पूरक घटना आहे. सध्याच्या महामारीच्या संकटातून बाहेर आल्यानंतर अनेक व्यवसायाबाबत चर्चा होईल. यावेळी मिडियाबाबतही चर्चा करता येईल. अधिकचा धोका पत्करून "पत्रकारीतेचा घेतला वसा" म्हणून काम करणे योग्य व रास्त ठरणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात "कोरोनाला आपण हरवु आणि नक्कीच जिंकू" असा आत्मविश्वास व्यक्त करीत आहेत. मग मीडियानेही थोडा संयम राखून अशा कठीण प्रसंगी सुलभ मार्ग स्वीकारून महानगरांबरोबरच ग्रामीण भागामध्ये काम करणाऱ्या पत्रकारांच्या हिताचा निर्णय घेणे योग्य ठरेल.
गोरख तावरे
9326711721