पाणीटंचाईचे प्रस्ताव दोन दिवसात मंजुरीला पाठवा : गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई
कराड - टंचाई काळात टँकरने पाणी पुरविण्याची संख्या आता पाच ते सहा एवढीच राहिली आहे परंतू डोंगरपठारावरील गावामध्ये तसेच वाडयावस्त्यांवर विंधन विहीरी काढून देण्याची मोठया प्रमाणात मागणी आहे.सुमारे ४५ गांवे व वाडयावस्त्यांमध्ये विधंन विहीरीची आवश्यकता असून २७ नळ पाणी पुरवठा योजनांच्या दुरुस्ती करणे गरजेचे आहे. आता एप्रिल महिना सुरु झाला आहे. तात्काळ विधंन विहीर, नळ पाणी पुरवठा योजना दुरुस्ती व टँकरचे प्रस्ताव येत्या दोन दिवसात प्राधान्यक्रमाने मंजुरीकरीता जिल्हाधिकारी यांचेकडे पाठवा अशा सूचना गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाईंनी अधिकाऱ्यांना केल्या असून तुमचे प्रस्ताव सादर झाले की लगेच मी जिल्हाधिकारी, सातारा यांचेशी बोलतो असेही ना.शंभूराज देसाईंनी यावेळी सांगितले.
गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाईंच्या अध्यक्षतेखाली माहे एप्रिल,मे महिन्यामध्ये जाणवणाऱ्या पाणी टंचाई काळातील उपाययोजना करणेकरीता व पाणी टंचाई मुक्तीकरीता लागणारा निधी आणण्याकरीता प्रस्ताव तयार करुन सादर करणेकरीता बैठक आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी बैठकीचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, तहसिलदार समीर यादव, गटविकास अधिकारी मीना साळुंखे,पाणी पुरवठा विभागाचे प्रभारी उपअभियंता खाबडे सर्व शाखा अभियंता यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी ना.शंभूराज देसाईंनी प्रथमत: माहे एप्रिल,मे महिन्यापर्यंत मतदारसंघातील डोंगरी आणि दुर्गम भागात डोंगरपठारावर पाणी टंचाई जाणवणाऱ्या गांवाना व वाडयावस्त्यांना पाणी टंचाई जाणवू नये याकरीता जानेवारी महिन्यामध्ये सादर केलेल्या आराखडयातील किती गांवाचा सर्व्हे पाणी पुरवठा विभागाने पुर्ण केला आहे? किती कामांचे अंदाजपत्रक तयार झाले आहेत याची सविस्तर माहिती घेतली त्यानंतर प्राधान्याने पाच ते सहा गांवाना टँकरने पाणी पुरवठा करणे गरजेचे आहे त्या गांवाची सद्यस्थिती काय आहे? पाच ते सहा गांवातील किती प्रस्ताव मंजुर झाले व किती प्रस्ताव मंजुरीला पाठविले आहेत. तसेच विधंन विहीरी काढायच्या आहेत त्याचा सर्व्हे पुर्ण झाला का? नळ पाणी पुरवठा योजना दुरुस्तीच्या एकूण २७ गावातील मागण्या आल्या आहेत त्याचाही सर्व्हे करुन याची अंदाजपत्रके तयार केली आहेत का ? असे प्रश्न गटविकास अधिकारी आणि पाणी पुरवठा उपविभागाच्या सर्व शाखा अभियंताना करुन पाच ते सहा गांवाना टँकर पुरविणे,४५ गांवामध्ये विधंन विहीरी काढणे व २७ गांवाच्या नळ पाणी पुरवठा योजनांच्या दुरुस्त्या करणे याचे प्राधान्यक्रमाने प्रस्ताव अंदाजपत्रकासह तयार करा आणि येत्या दोन दिवसात ते जिल्हाधिकारी, सातारा यांचेकडे मंजुरीकरीता सादर करा.
अशा सुचना करीत पाणी पुरवठा विभाग हा अत्यावश्यक सेवेमध्ये येतो त्यामुळे कोरोनाचे संकटाचे कारण सांगून पाणी टंचाई काळात पाणी पुरवठा विभागाकडून कोणतीही हयगय नको. मी दोन दिवसानंतर स्वत: पाणी टंचाईकामांना मंजुरी मिळणेबाबत जिल्हाधिकारी सातारा यांचेशी बोलणार आहे त्यामुळे पाणी पुरवठा विभागाची कोणतीही कारणे एैकून घेतली जाणार नाहीत गटविकास अधिकारी आणि पाणी पुरवठा विभागाच्या सर्व शाखा अभियंत्यांनी पाणी टंचाई ही बाब गांभीर्याने घ्यावी असेही ते शेवठी म्हणाले.
कोरोनाच्या सद्यस्थितीचाही ना.शंभूराज देसाईंनी घेतला आढावा
पाणी टंचाईंची बैठक संपलेनंतर उपस्थित प्रांताधिकारी,तहसिलदार, गटविकास अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय अधीक्षक यांचेकडून पाटण मतदारसंघात कोरोनाची सद्यपरिस्थिती काय आहे? याचा आढावा ना.शंभूराज देसाईंनी घेत कोरोनाच्या पार्श्वभूमिवर विविध विषयांवर चर्चा करीत आवश्यक त्या उपाययोजना करण्यासंदर्भात सुचित करुन माहे एप्रिल महिन्याचे धान्य लाभार्थ्यापर्यंत पोहोच झाले का? लवकरात लवकर पोहोच करा असेही त्यांनी यावेळी सांगितले.