माजी मुख्यमंत्री आ पृथ्वीराज चव्हाणांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
कराड : कोरोनापासून खबरदारीचा उपाय म्हणून सरकारने लॉकडाऊन ३ में पर्यंत वाढवला आहे. तरीसुद्धा कोरोनाच्या रुग्णांचा वाढता आकडा बघता लॉकडाऊन कधी संपेल किंवा किती वाढविला जायील याबद्दल सर्वच साशंक आहेत. अश्या परिस्थितीत राज्यातील काही महत्वाचे घटक आहेत कि ज्यांचा रोजी रोटीचा प्रश्न आहे अश्यांना राज्य सरकारतर्फे काही मदत व्हावी तसेच कोरोनाच्या अनुषंगाने काही महत्वपूर्ण सूचना माजी मुख्यमंत्री आ पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्याचे मुख्यमंत्री श्री उध्दव ठाकरे यांना पत्रातून मांडल्या आहेत.
आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्रात वैद्यकीय, स्वस्त धान्य वितरण, कृषी अर्थ व्यवस्था, वृत्तपत्रांचे नियमित वितरण तसेच परदेशात व कोटा येथे अडकलेले महाराष्ट्राचे विद्यार्थी या विषयांचा समावेश आहे. आ. पृथ्वीराज चव्हाण कोरोनाच्या बाबतीत जनतेमध्ये जनजागृती व्हावी यासाठी स्वतः गावागावांमध्ये तसेच शहरामध्ये फिरत आहेत त्याचबरोबर या अभियानादरम्यान जनतेकडून अडचणी समजून घेत आहेत, त्या प्रश्नांचा राज्यभर कितपत परिणाम होत आहे किंवा असे प्रश्न राज्यात कोणकोणत्या भागात जाणवत आहेत याची माहिती घेऊन मुख्यमंत्र्यांशी व सबंधित विभागाच्या सचिवांशी फोनवरून चर्चा करीत आहेत.
आ पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना ज्या विविध सूचना व मागण्या केल्या आहेत त्या खालीलप्रमाणे-
१) वैद्यकीय
· कोरोना टेस्टिंग बद्दल स्पष्ट निर्देश द्यावेत. टेस्टिंगचा खर्च कोण करणार त्याबद्दल स्पष्टीकरण दिले जावे. तसेच टेस्टिंगचा सर्व खर्च महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेमध्ये समाविष्ट केला जावा व तसे सुस्पष्ट आदेश देण्यात यावेत.
· खाजगी डॉक्टरांना व खाजगी दवाखान्यांना जिल्हयाधिकार्यां मार्फत PPE किटचे वितरण करावे.
· केंद्राने Rapid Testing बंद केले आहे. त्याबद्दल सुस्पष्ट सूचना देणे गरजेचे आहे.
२) स्वस्त धान्य दुकान
· धान्य विकत घेताना लाभार्थीना POS मशीन मध्ये बोटांचा ठसा उमटला नाही तर त्यांना धान्य दिले जात नाही, परंतु शासनाच्या १७ मार्च, ३१ मार्च व १७ एप्रिल च्या परिपत्रकानुसार POS चा वापर न करता धान्य दिले पाहिजे असे परिपत्रक आहे. पण त्याबद्दल GR नसल्यामुळे त्याची माहिती दुकानदारांना व ग्राहकांना नाही त्यामुळे या निर्णयाची माध्यमांमधून जाहिरात करण्यात यावी.
· बाहेरच्या राज्यातील किंवा जिल्ह्यातील मजुरांकडे शिधा पत्रिका नसल्यास त्यांना अंत्योदय योजनेप्रमाणे तीन महीने धान्य दिले जावे. त्याचबरोबर त्यांना आधार कार्डवर – बांधकाम मजुरांप्रमाणे महिना २००० रुपये भत्ता देण्यात यावा.
३) कृषि अर्थ व्यवस्था
· शेतकर्यांनी मागील कर्जाचे हफ्ते न दिल्यास त्यांना नवीन कर्ज मिळाले पाहिजे.
· खरीप हंगामाकरिता शेतकर्यांना खाते व बियाणे यांचा योग्य पुरवठा करावा.
· कापूस खरेदी यंत्रणा मजबूत करावी व शेतकर्यांना हमीभावाची खात्री द्यावी.
· RBI ने हफ्ते व व्याज भरण्याकरिता तीन महिन्याची मुदतवाढ दिली आहे. ती सहकारी पतसंस्था व विकास संस्था सेवा सोसायट्यांनाही लागू करावी.
· राष्ट्रीयीकृत बँकांचे व सहकारी बँकांची कर्जे तीन महिन्यांवरून सहा महिन्यापर्यंत मुदत वाढवावी तसेच सहा महिन्यांचे व्याज केंद्र शासनाने भरण्याची विनंती करावी.
४) कोरोना साथीबद्दल अधिकृत माहिती
· वर्तमानपत्रांचे वितरण चालू ठेवावे.
· केबल कंपन्यांना विनंती करून केबल कंपन्यांचे दर पुढील तीन महिन्याकरिता कमी करण्यात यावेत.
· WiFi ची व्यवस्था ही आज जीवनावश्यक गरज झाली आहे. त्यांचे दर ही पुढील तीन महिन्याकरिता कमी करावयास टेलिकॉम कंपन्यांना सांगावे.
५) लॉकडाऊन
· परदेशात ५०,००० वर भारतीय विद्यार्थी अडकून पडले आहेत, त्यापैकी ५००० ते ७००० महाराष्ट्रातील विद्यार्थी आहेत. त्यांचे जेवणाचे व राहण्याचे हाल चालले आहेत. त्यांना विमानाने भारतात परत आणण्यासाठी केंद्राशी संपर्क साधावा.
· कोटा राजस्थान येथे हजारो विद्यार्थी स्पर्धा परीक्षांसाठी जातात, त्यातील महाराष्ट्राचे २००० वर विद्यार्थी आहेत. त्यांना परत आणण्यासाठी विशेष बसेस पाठविल्या पाहिजेत. उत्तर प्रदेश च्या मुख्यमंत्र्यांनी त्यांचे ७५०० विद्यार्थी २५० बसेस पाठवून घरी परत आणले आहेत.
सध्या कोरोनाच्या अनुषंगाने देशभर लॉकडाऊन सुरु आहे अश्या परिस्थितीत हातावर पोट असणारे व शेतकरी यांचे प्रश्न अतिशय गंभीर आहेत तसेच महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थी परदेशात राहत आहेत त्यांची तिथे गैरसोय होत आहे तसेच राजस्थानमधील कोटा येथे महाराष्ट्रातील २००० च्या वर विद्यार्थी अडकले आहेत तसेच इतरही महत्वाचे प्रश्न, सूचना व मागण्या माजी मुख्यमंत्री आ पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या या पत्रात आहेत.