सत्यकथा.....हरिष खेडकर यांच्या लेखणीतून....
विधी वैज्ञानिक प्रयोगशाळा (Forensic Science Lab)..... ( महाराष्ट्रातील FSL मधील अधिकारी व कर्मचारी अटक झालेबाबतची एकमेव सत्यकथा )
हरिष खेडकर
DySP, AC
आज विधी वैज्ञानिक प्रयोगशाळा या विषयावर थोडेसे लिहित आहे. पोलीस तपासामध्ये तपास करताना, आरोपीचे विरुध्द वेगवेगळे पुरावे गोळा करावे लागतात. त्यामध्ये प्रत्यक्ष पुरावे आणि अप्रत्यक्ष पुरावे असे ढोबळमानाने दोन प्रकार पडतात. प्रत्यक्ष पुरावा म्हणजे..घटना प्रत्यक्ष पहाणारे साक्षीदार, अप्रत्यक्ष म्हणजे परिस्थितीजन्य पुरावे, ज्यामध्ये घटनास्थळावरून जप्त केलेले रक्त, माती, थुंकी, विर्य, केस, रक्त लागलेले कपडे, हत्यारे, आरोपी कडुन जप्त केलेले रक्ताचे कपडे, हत्यारे, त्यांचे रक्ताचे,विर्याचे नमुने,डी एन ए नमुने,पिडीत व्यक्तीचे रक्ताचे नमुने, कपडे इत्यादी इत्यादी.....
अशाप्रकारे हे परिस्थितीजन्य पुरावे गोळा करुन ते व्यवस्थित पॅक करून, पंचसमक्ष लाखमोहर सिलबंद करुन तपासणीसाठी व घटनेचा, आरोपीचा व पिडीत व्यक्तीचा एकमेकांशी आलेला संपर्क, संबंध सिध्द करण्यासाठी विधी वैज्ञानिक प्रयोगशाळेत पाठविले जातात. अशा प्रयोगशाळेत त्या त्या विषयाशी संबंधित अशा तज्ञ व्यक्ती असतात. त्या त्यांचे कडे आलेले असे नमुने रासायनिक दृष्टीने पृथ्थकरण ( मराठी माणसांना समजण्यासाठी.... Chemical Analysis ) करुन त्यांचा त्यासंदर्भातील अहवाल त्या त्या पोलीस स्टेशन ला....तपासी अधिकारी यांना पाठवतात. संबंधित तपासी अधिकारी ते अहवालाचे अनुषंगाने आणखी पुरावे गोळा करु शकतो किंवा तो अहवाल दोषारोप पत्रासोबत पुरावा म्हणून जशाचा तसाही न्यायालयात सादर करतो.
अशा पुराव्यास आरोपींविरुध्द गुन्हा सिध्द करण्यासाठी अनन्यसाधारण महत्त्व असते, कारण तो त्या विषयातील तज्ञाने दिलेला पुरावा असतो व भारतीय पुरावा कायदा कलम 45 नुसार तज्ञ व्यक्तीने दिलेला पुरावा हा कायदेशीर व योग्य असा पुरावा समजला जातो, आणि असा पुरावा प्रत्यक्ष पुरावा,जसे घटना पाहणारी व्यक्ती, पंच साक्षीदार हे आपली साक्ष ऐन वेळी फिरवु शकतात, Hostile होतात, पंरतु तज्ञांचा असा पुरावा बदलु शकत नाही.
त्यामुळे अशा पुराव्यामुळे आरोपीस शिक्षा होणार की नाही हे निश्चित होऊ शकते, यादृष्टीने फार महत्त्व असल्याने पुष्कळ वेळा असा तज्ञांचा अहवालच आपले साठी पुरक कसा आणता येईल याकरिता काही आरोपी त्यांचे हस्तका मार्फत प्रयत्न करीत असतात. FSL मधील तज्ञ अधिकारी यांचे पर्यंत पोहचुन आपल्याला पाहिजे तसा अहवाल मिळविण्यासाठी साम दाम निती अवलंबतात, पंरतु FSL मधील बरेचसे अधिकारी अशा अमिषाना बळी न पडता निःस्पृह पणे अपले कर्तव्य करुन जे सत्य असेल असाच अहवाल देतात. पंरतु म्हणतात प्रत्येक क्षेत्रात काही लोक असे असतात की त्यांनी स्वाभिमान, नितीमुल्ये गुंडाळून ठेवलेली असतात.आजपर्यंत मला तरी वाटते अशी उदाहरणे फार कमी असतील आणि असले तरी त्यांनी असा गैरप्रकार केला आणि तो उघड करण्यात पोलीस यशस्वी झाले आहेत असे प्रकार तर खचितच.
परंतु आम्ही असा एक प्रकार उघडकीस आणुन औरंगाबाद FSL मधील एक रासायनिक विश्लेषक व दोन वाॅचमन यांना अटक करून त्यांचे विरुद्ध न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केलेले आहे. आणि कदाचित ही महाराष्ट्रातील तरी एकमेव घटना असावी. मी सन 2015 मध्ये उस्मानाबाद जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख म्हणून नेमणूकीस होतो. त्यावेळी आमचे पोलीस अधीक्षक म्हणून मा अभिषेक त्रिमुखे साहेब हे होते. सन 2013 मध्ये उस्मानाबाद शहरात राजनंदिणी खुन प्रकरण खुप गाजले होते. एका संग्राम नावाचे तरुणाने प्रेम प्रकरणातून त्याची प्रेयसी राजनंदिणी हिचा चाकूने वार करुन खुन केला होता. खुन करुन तो स्वतः उस्मानाबाद शहर पोलीस स्टेशन ला येवुन त्यानेच खुनाची खबर दिली होती.त्याचे फिर्यादी वरुन त्याचेच विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हाचा तपास तत्कालीन उस्मानाबाद शहर उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती वैशाली कडुकर मॅडम यांनी करुन गुन्ह्यात आरोपी संग्राम विरुद्ध दोषारोप पत्र न्यायालयात दाखल केले होते.
तपासामध्ये त्यांनी आरोपीने गुन्हा करणेसाठी वापरलेला रक्तरंजित चाकू, आरोपी चे अंगावरील रक्ताने माखलेला टी शर्ट, जीन पॅन्ट जप्त करुन रासायनिक तपासणी करिता FSL औरंगाबाद येथे पाठविले होते.
खटल्याची सुनावणी सुरू झालेवर,आरोपीने जरी स्वतः गुन्हा करुन गुन्ह्याची फिर्याद दिली होती तरीही त्याने स्वतः गुन्हा नाकबूल केला. इतर सर्व साक्षीदार तपासले गेले. ज्यावेळी तपासी अधिकारी कडुकर मॅडम यांची साक्ष सुरु झाली, साक्षदरम्यान मॅडम यांना गुन्ह्यातील मुद्देमाल दाखविण्यात आला त्यावेळी मॅडम यांना आश्चर्याचा धक्काच बसला कारण चाकु, टी शर्ट व जीन पॅन्ट वर रक्ताचा थेंब सुध्दा दिसत नव्हता. मॅडम यांनी मा न्यायाधीश साहेबांना स्पष्ट पणे हा मुद्देमाल मी जप्त केलेला नसुन हा वेगळाच मुद्देमाल आहे असे सांगितले . मा न्यायालयाने याची गंभीर दखल घेतली. मा न्यायाधीश महोदयांनी खटल्याची सविस्तर सुनावणी पुर्ण करुन पुराव्याचे योग्य असे मुल्यमापन करुन गुणवत्तेचे आधारवर (Judgement on Merit of evidence) आरोपी यास संशयाचा फायदा देवुन दोषमुक्त केले. पंरतु बदललेल्या मुद्देमाल बाबत पोलीस अधीक्षक यांनी स्वतंत्रपणे तपास करुन दोषी व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करावी व केले कारवाई चा अहवाल न्यायालयास सादर करावा असे निकालपत्रात नमुद केले.
वास्तविक हा निकाल मी उस्मानाबाद जिल्ह्यात हजर होणे पुर्विच लागलेला होता. मला किंवा मा पोलीस अधीक्षक साहेब यांनाही या प्रकरणाबाबत काहीही माहिती नव्हती. पंरतु एके दिवशी पत्रकार बंधुनी मा पोलीस अधीक्षक साहेब यांना राजनंदिणी खुन प्रकरणात मुद्देमाल बदलण्यात आला होता व न्यायालयाने त्यासंदर्भात चौकशी चे आदेश दिले होते याबाबत पुढे काय कारवाई करण्यात आली याबाबत विचारणा केली व त्याअनुशंगाने वर्तमानपत्रात बातम्या प्रसिद्ध केल्या. मा पोलीस अधीक्षक साहेब यांनी सदर प्रकरण काय आहे त्याची सविस्तर माहिती घेवुन मला चर्चा करणेसाठी बोलावून घेतले. मी माझे दप्तरी तसेच पोउनि भास्कर पुल्ली यांचेशी या गुन्ह्याबाबत सविस्तर चर्चा केली . निकालपत्राचे वाचन केले व निकालपत्राची प्रत सोबत घेवुन मा पोलीस अधीक्षक साहेब यांना भेटलो. गुन्ह्याची व निकालपत्राची सविस्तर माहिती दिली, मा न्यायाधीश साहेब यांनी मा पोलीस अधीक्षक साहेब यांना दिलेल्या निर्देशा वर चर्चा केली. मा पोलीस अधीक्षक साहेब यांनी आदेश दिले की, " यास जे कोणी जबाबदार असतील त्यांचे विरुद्ध पुरावा नष्ट केलेबाबतचा गुन्हा दाखल करा" .मी म्हटले, "पण सर यामध्ये फिर्याद कोणाची घ्यायची व तपास कोणाकडे द्यावयाचा?"
त्यावर सरांनी सांगीतले की, "ज्या पोलीस स्टेशनला संबंधित गुन्हा दाखल होता, त्या पोलीस स्टेशन चे सध्याचे प्रभारी अधिकारी यांची फिर्याद घ्या आणि तपास तुम्ही स्वतः करा".
मा पोलीस अधीक्षक साहेब यांचे आदेशानुसार मी उस्मानाबाद शहर पोलीस स्टेशन चे प्रभारी अधिकारी, पो नि श्री शेख साहेब यांना सरांचे आदेशाबाबत माहिती दिली व त्यांचे फिर्यादीवरुन अज्ञात आरोपी विरुद्ध खुनाचे गुन्ह्यातील आरोपीचे जप्त केलेले कपडे , चाकु असा मुद्देमाल बदलून पुरावा नष्ट केलेबाबतचा भा.द.वि कलम 201 प्रमाणे गुन्हा दाखल करुन तपास माझे कडे घेतला.
तपासामध्ये खुनाचे गुन्ह्यात तपासी अधिकारी यांनी मुद्देमाल जप्त केलेपासुन, मुद्देमाल पोलीस ठाण्यात मुद्देमाल कारकुन कडे जमा करणे, विशेष पोलीस दुत (Special Carrier) मार्फत FSL औरंगाबाद ला पाठविणे, तेथे तपासणी झालेनंतर परत पोलीस स्टेशन ला आणणे, तेथून न्यायालयात जमा करणे या सर्व कार्यप्रणाली मध्ये जे जे संबंधित होते या सर्वाकडे आम्ही कसुन तपास केला पण निश्चित मुद्देमाल कोठे बदलला गेला हे काही समजुन येत नव्हते. संशयाची सुई उप विभागीय पोलीस अधिकारी यांचे कार्यालयाभोवती फिरत होती. कारण मला गोपनीय माहिती देणारे सांगत होते की, SDPO कार्यालयातील मॅडम यांचे रायटर यांनीच काहीतरी गौडबंगाल केले आहे.पण माझे मन मला सांगत होते की, आपला कोणीही पोलीस कर्मचारी एवढे धाडस करणार नाही, स्वतःची नौकरी पणाला लावणार नाही.
मी, मुद्देमाल FSL औरंगाबाद ला पोहोच करणारे कर्मचारी यांचे कडे पुन्हा चौकशी केली. मुद्देमाल घेवून जाताना लाखसिल intact होते का? FSL मध्ये मुद्देमाल कोणी स्विकारला? त्याचे कडेही तपास केला. मा उपसंचालक FSL यांना लेखी पत्र देवुन मुद्देमाल त्यांचे कार्यालयात प्राप्त झाले पासुन तपासणी होवुन मुद्देमाल व तपासणी अहवाल परत पोलीस स्टेशन ला पाठविले पर्यंत चे सर्व कागदपत्राच्या प्रमाणित प्रती घेतल्या, त्याचे अवलोकन केले तर, मुद्देमाल तपासणी करिता उघडला त्यवेळी लाखसिल intact होते, पण तपासणी मध्ये चाकु, टी शर्ट व जीन पॅन्ट यावर कोठेही रक्तच आढळून आले नव्हते. पुन्हा संशय SDPO कार्यालयावरच!
सर्वांचे CDR मागवावेत तर, घटना 2013 मधील, कोणतीही मोबाईल कंपनी CDR देत नव्हती. मी भास्कर पुल्ली यांना विचारले, भास्कर, तुम्ही तर खुनाचा गुन्हा घडला त्यावेळी शहर पोलीस स्टेशन ला होतात ना, मग त्यावेळी गुन्ह्याचे तपासामध्ये कोणाचे CDR मागविले होते काय?
भास्कर CDR analysis आणि Cyber चे कामात तरबेज होता.
त्यांनी सांगितले, "सर, पोलीस अधिकारी कर्मचारी यांचे कोणाचेच CDR मागविले नव्हते, कारण तशी काही आवश्यकता नव्हती पण आरोपी संग्राम आणि त्याचे वडिलांचे CDR मागविले होते आणि ते माझे लॅपटॉप मध्ये असतील सुध्दा". भास्कर चे या उत्तराने माझे मनाला एक वेगळीच उभारी आली. मी लागलीच त्यांना सांगितले, आत्ताचे आत्ता मला दोन्ही CDR पहायचे आहेत, आम्ही CDR चे अवलोकन केले, मी विशेष करुन आरोपीचे वडिलांनी वारंवार काॅल केलेले नंबर्स शोधले, तसेच टाॅवर आयडी वरुन औरंगाबाद ला केलेले काॅल शोधले. त्यांचे मालक (SIM Owner) व पत्ते याबाबत माहिती घेतली आणि काय आश्चर्य, या आजपर्यंत सुरु असलेल्या अंधारयुक्त तपासामध्ये मला एक मिणमिणता दिवा दिसला. एका मोबाईल धारकाचा पत्ता होता...निझाम बंगला औरंगाबाद. आता ज्या अधिकारी यांनी मराठवाड्यात नौकरी केली असेल त्यांना लगेच लक्षात येईल की, हा पत्ता औरंगाबाद FSL कार्यालय व परिसराचा आहे.
मी लागलीच तपासाचे प्रगती बाबत मा पोलीस अधीक्षक साहेब यांना माहिती दिली व औरंगाबाद ला जाण्याची परवानगी घेतली. शासकीय वाहनाने सोबत फक्त दप्तरी यास घेवून औरंगाबाद FSL येथे पोहोचलो. यापूर्वी याच गुन्ह्याचे तपासकामी दोन वेळा येवुन गेलेलो असल्याने उपसंचालक मॅडम यांचा चांगला परिचय झालेला होता. मॅडम यांना भेटुन पवार नावाचे कोणी कर्मचारी FSL मध्ये नेमणूकीस आहेत काय ? याबाबत चौकशी केली असता, मॅडम यांनी सदर व्यक्ती वाॅचमन म्हणून नौकरीस असल्याचे सांगितले. तो आता कार्यालयात हजर आहे का? असे विचारता, त्यांनी रात्रपाळी ड्युटी केली असुन सध्या कार्यालयात हजर नसल्याचे कळविले. ते कोठे राहतात? असे विचारता, इथे बाजुलाच, शासकीय निवासस्थानामध्ये राहतात, असे सांगताच माझा संशय पक्का झाला. मी त्यांना कार्यालयात बोलावून घेणे बाबत मॅडम यांना सुचना केली. मॅडम यांनी तात्काळ शिपाई पाठवुन पवार यांना कार्यालयात बोलावून घेतले. मी मॅडम यांचे परवानगीने पवार यांना एका स्वतंत्र खोलीमध्ये घेवुन , दप्तरी आणि मी त्याचेकडे सुरुवातीला इकडच्या तिकडच्या विषयावर चर्चा करुन आरोपीचे वडील राजेंद्र साळुंके याचे बाबत विचारताच वाॅचमन पवार याचा चेहरा पाहण्यासारखा झाला. मग त्याने जास्त आढेवेढे न घेता सरळ सरळ कबुली देवुन टाकली.
साहेब, मला यातुन वाचवा, माझा काहीच रोल नाही. मी माजी सैनिक असल्याने व राजेंद्र साळुंके हे पण माजी सैनिक अधिकारी असल्याने त्यांनी कोठून तरी मी येथे नेमणूकीस असल्याची माहिती काढली. मला येवुन भेटले. त्यांचे मुलाने केलेल्या खुनाबाबत सर्व हकीगत सांगुन त्याचे गुन्ह्याचे वेळीचे अंगावरील कपडे व चाकु तपासणी करिता इकडे आलेबाबत सांगीतले. यामध्ये काही मदत करता येईल का ? असे विचारले. मी त्यांना सांगितले, " मी साधा वाॅचमन आहे , माझे हातात काही नाही".
पण तरीही त्यांनी दुसरे कोणाचे मदतीने काही करता येईल का बघा , असे म्हणून मोठ्या रकमेची ऑफर दिली. मी त्यांना सांगितले की, मी ते तपासणी करणारे अधिकारी असतात ना , त्यांची तुमची भेट घालुन देतो. नंतर ते तयार होत असतील तर तुमचे तुम्ही बघुन घ्या. मग एक रविवार पाहुन मी तपासणी करणारे अधिकारी सुधाकर जाधव साहेब व राजेंद्र साळुंके यांची भेट घालुन दिली. त्यांचे आपसात सर्व काही ठरले व पुढचे रविवारी त्यांना मुलाचे जशा प्रकारचेे कपडे जप्त झाले होते तसेच टी शर्ट व जीन पॅन्ट आणि चाकु घेवून येण्यास सांगितले. पण नेमकी पुढचे रविवारी माझी ड्युटी दिवसा नसलेने दुसरे वाॅचमन गांगे यांना पण आम्हाला हे सर्व सांगुन त्यांनाही या कारस्थानात सामील करून घ्यावे लागले.
पुढचे रविवारी ठरले प्रमाणे साळुंके कपडे व चाकु घेवून आले. जाधव साहेब पण आले होतेच. रविवारी FSL कडे कोणीही फिरकण्याचा प्रश्नच येत नसतो, तरीही आम्ही दोघे वाॅचमन सर्वत्र बारकाईने लक्ष ठेवून होतो. जाधव साहेब यांनी चाव्या घेवून कार्यालय उघडुन ते व साळुंके आतमध्ये गेले. आतमध्ये त्यांनी काय केले ? जप्त करुन तपासणीसाठी आलेले कपडे व चाकु कसे बदलले? मुळ मुद्देमालाचे काय केले? हे जाधव साहेब यांनाच माहिती".अशी सविस्तर माहिती सांगितले वर माझा तर प्रथम यावर विश्वास च बसत नव्हता. मी त्यास पुन्हा पुन्हा सांगत होतो, चुकीची किंवा खोटी माहिती देवु नकोस. पण तो त्याचे म्हणणे वर ठाम होता अणि मला यामधून वाचवा एवढेच म्हणत होता. मी त्यास मॅडम समोर आणले.मॅडम यांना आम्ही काहीही सांगितले नाही, फक्त सुधाकर जाधव आज ड्युटी वर आहे का हे विचारले , जाधव हजर होते, त्यांना बोलावून घेतले मॅडम यांना सांगुन परत जाधव व पवार यांना घेवुन पुन्हा एका स्वतंत्र खोलीमध्ये गेलो,तेथे फक्त दप्तरी, मी आणि ते दोघे ! खोलीचा दरवाजा आतुन बंद केला, पवार यास एका कोप-यात खुर्चीवर बसून रहायला व विचारले शिवाय एक शब्दही बोलायचा नाही अशी सक्त सुचना दिली.
जाधव सोबत सुध्दा थोडया इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या, नौकरी किती वर्ष झाली, घरी कोण कोण असतात...वगैरे वगैरे. मग मुळ मुद्यांवर येवुन राजेंद्र साळुंके बाबत विषय काढला. तसेच वाॅचमन पवार.याने सर्व काही इत्यंभूत सांगीतले आहेच.आता फक्त तुम्ही मुद्देमाल कसा बदलला ? किती मध्ये सगळा व्यवहार झाला? असे विचारताच जाधव अक्षरशः रडु लागला ( मुळात हे दोघेही सराईत गुन्हेगार नसलेने त्यांना बोलते करण्यासाठी अम्हाला काहीही विशेष परिश्रम घ्यावे लागले नाहीत). जाधव यांनी मुद्देमाल लाखसिल बंद लिफाफ्यातुन सिल intact ठेवुन कसा बाहेर काढला आणि दुसरा मुद्देमाल तिथे कसा ठेवला तसेच किती अमाऊंट मध्ये हा सर्व व्यवहार झाला, तिघांना किती किती वाटुन आले हे सर्व सांगीतले...पण.हे सर्व इथे नमुद करणे अजिबात उचित वाटत नाही.
तिसरा आरोपी वाॅचमन गांगे हा त्या दिवशी हजर नसलने त्याला ताब्यात घेण्याची घाई न करता, दोघांना तपास कामी अटक करणे करिता ताब्यात घेत असलेबाबतचे पत्र उपसंचालक मॅडम यांना दिले. मॅडम यांना तिघांचे कृष्ण कृत्याबद्दल माहिती दिली, त्यांचे चेह-यावरील काळजी युक्त भिती लपता लपत नव्हती. दोघांना घेवून उस्मानाबाद कडे निघालो, एव्हाना पाच वाजून गेले होते. भास्कर पुल्ली यांना फोन करून राजेंद्र साळुंके यास ताब्यात घेणे बाबत सुचना दिल्या. रात्री नऊचे सुमारास उस्मानाबाद ला पोहचलो. साळुंके काही मिळाला नव्हता. दोघांची वैद्यकीय तपासणी करुन त्यांना रितसर गुन्ह्यात अटक केली. तपासाचे प्रगती बाबत मा पोलीस अधीक्षक साहेब यांना माहिती दिली. अशक्यप्राय अशा गुन्ह्यात मुळ आरोपी पर्यंत पोहचुन त्यांना अटक केल्याचे ऐकुन मा पोलीस अधीक्षक साहेब फार खुश झाले. पण मुख्य आरोपी साळुंके मिळुन न आलेने थोडीशी खंत वाटत होती. कारण आता हे आरोपी अटक झालेचे समजले की तो नक्कीच फरार होणार. आणि झाले ही तसेच हे दोन आरोपी अटक झालेली बातमी सर्व वर्तमानपत्रामध्ये अगदी ठळक पणे आलेने साळुंके फरार झाला. तिसरा आरोपी वाॅचमन गांगे त्यास दिले सुचने प्रमाणे स्वतः होऊन औरंगाबाद वरुन उस्मानाबाद ला आला. त्यालाही रितसर अटक करुन तिन्ही आरोपीना न्यायालयात हजर करुन 5 दिवस पोलीस कोठडी रिमांड घेतली. तपासामध्ये गुन्ह्यात भा दं वि कलम 120 (ब) व 34 वाढवुन न्यायालयात अहवाल दिला जेणेकरून साळुंके यास अटकपूर्व जामीन मिळणार नाही. पंरतु न्यायालयाने साळुंके यास सदर गुन्ह्यात दोषारोप पत्र दाखल होईपर्यंत दररोज 1000 ते 1500 वाजेपर्यंत स्थानिक गुन्हे शाखेत हजेरी देणेचे अटींवर जामीन मंजूर केला. चारही आरोपी विरुद्ध बारीक सारीक पुरावे, दस्तऐवजी पुरावे ,साक्षीदार यांचे जाबजबाब यांचे आधारे न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. FSL मधील तिघांना त्यांचे् वरिष्ठ अधिकारी यांनी प्रथम निलंबित करून, त्यांची खातेनिहाय चौकशी करुन त्यांना शासन सेवेतुन बडतर्फ केले . साळुंके हा उस्मानाबाद जिल्हा सैनिक कल्याण बोर्ड मध्ये नौकरीस होता , त्यालाही सेवेतुन निलंबित करण्यात आले.
राजनंदिणीचे खुन्याला सत्र न्यायालयात जरी शिक्षा लागली नसली तरी त्याचे विरुद्ध चे अपिल मा उच्च न्यायालय औरंगाबाद यांनी दाखल करुन घेतलेले आहे. बघु भविष्यात त्यामध्ये पुढे काय होईल ते न्याय देवता ठरवेलच .
पण सध्या दोन गोष्टीचे समाधान हे की, राजनंदिणी चे आत्म्यास थोडाफार तरी सुकुन मिळाला असेल. आणि दुसरे असे की, उस्मानाबाद मधील बहुतांश लोक या प्रकरणात पोलीस विभाग विशेष करुन SDPO कार्यालय उस्मानाबाद यांचे कडे संशयाने पहात होते, ते संशयाचे मळभ दुर करुन पोलीस विभाग पुर्ण पणे निर्दोष असल्याचे जनतेसमोर आणु शकलो.....
जयहिंद, जय महाराष्ट्र पोलीस