बाहेरगांवाहून आलेल्या व्यक्तींना सन्मानांची वागणूक... कोणताही दुजाभाव नाही....अफवांवर विश्वास ठेवू नये गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई


बाहेरगांवाहून आलेल्या व्यक्तींना सन्मानांची वागणूक... कोणताही दुजाभाव नाही....अफवांवर विश्वास ठेवू नये गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई


 कराड - पाटण मतदारसंघात ५० हजारांहून जादा नागरिक मुंबई,पुणे तसेच बाहेर गांवाहून आपआपल्या गांवी आले आहेत.कोरोना आजाराच्या कठीण परिस्थितीत बाहेरगांवाहून आलेल्या नागरिकांना दुजाभाव करुन त्यांची हेळसांड करण्यात येत असल्याचे काही विघ्नसंतोषी लोकांकडून विनाकारण सोशल मिडीयावर पसरविले जात आहे अशा अफवांवर पाटण विधानसभा मतदारसंघातील जनतेने विश्वास ठेवू नये.आपल्या मतदारसंघाची ही संस्कृती नाही.बाहेरगांवाहून आलेल्या ५० हजारांहून नागरिकांना मतदार संघातील प्रत्येक गांवामध्ये सन्मानांचीच वागणूक दिली जात असून कोणताही दुजाभाव केला जात नाही. बाहेरगांवच्या व्यक्तींना आपल्या व आपल्या परिवारांच्या आरोग्यासाठी आरोग्यांची तपासणी करुन घ्या याकरीता सातत्याने आवाहन करण्यात येत आहे. 


बाहेरगांवचा अनोळखी व्यक्ती कोणी गावात शिरु नये म्हणूनच अनेक गांवानी गावामध्ये प्रवेशबंदी केली आहे याचा गैरअर्थ काढण्यात येत असून अशा हुल्लडबाज विघ्नसंतोषींना गावकऱ्यांनीच गावांमध्ये एकता दाखवून धडा शिकवावा व प्रशासनाला सहकार्य करावे असे जाहीर आवाहन गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी केले आहे.


महाराष्ट्र राज्यामध्ये कोरोना आजाराने हाहाकार माजविला आहे.राज्यामध्ये कोरोना विषाणू बाधित व्यक्तींची संख्या कालपर्यंत सुमारे २२० च्या वर गेली असून दिवसेंदिवस यामध्ये वाढच होत आहे. कोरोना आजाराचा सामना करण्याकरीता केंद्र तसेच राज्यस्तरावरुन सर्वोत्तोपरी प्रयत्न केले जात आहेत.आपले पाटण मतदारसंघातही कोरोना आजारासंदर्भात उपाययोजना करुन दक्षता घेण्याचे काम तालुका प्रशासनाच्या व सर्वांच्या वतीने सुरु आहे. पाटण मतदारसंघात ५० हजारांहून जादा नागरिक मुंबई,पुणे तसेच बाहेर गांवाहून आपआपल्या गांवी आले आहेत.तर बहूतांशी नागरिक हे केंद्राने आणि राज्याने शासकीय नियम कडक केल्याने तसेच संपुर्ण देशामध्ये संचारबंदी,जमावबंदी व २१ दिवसांचे लॉकडाऊन केल्यामुळे  मुंबई, पुणे तसेच बाहेरगांवी अडकून पडले आहेत.


त्यांना प्रवास करताना अनेक अडचणी निर्माण होत आहेत. मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी या नात्याने अडचणीत सापडलेल्यांना दिलासा देणे त्यांना अडचणीतून बाहेर काढणे याकरीता मी स्वत: प्रयत्न करीत आहे.कोरोना आजारामुळे सर्वांचीच गैरसोय झाली आहे अशा कठीण परिस्थितीत आहे तिथेच राहणे योग्य असून बाहेरगांवाहून आलेल्या प्रत्येक नागरिकांना त्यांच्या व त्यांच्या परिवाराच्या आरोग्यासाठी तात्काळ मतदारसंघातील जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जावून आरोग्य तपासणी करण्याचे आवाहन मी करीत आहे. बाहेरगांवच्या नागरिकांना चांगल्या सुविधा देण्याचा तालुका प्रशासनाचा, आमचा व संबधित गांवकऱ्यांचा प्रयत्न असून बाहेरगांवाहून आलेल्या नागरिकांनीही गावकऱ्यांना व प्रशासनाला सहकार्य करण्याची गरज आहे. 


२१ दिवसांच्या लॉकडाऊनमुळे आपल्या राज्यामध्ये अनेक ठिकाणी जिल्हाबंदी,तालुकाबंदी करण्यात आली आहे. तर अनेक गांवानीही त्यांच्या सुरक्षितेकरीता बाहेरच्या अनोळखी व्यक्तींना गावबंदी केली आहे मात्र याचा गैरअर्थ काढण्यात येत असून काही विघ्नसंतोषी लोक हे बाहेरगांवाहून आलेल्यांना गांवात बंदी करण्यात आली असल्याच्या अफवा विनाकारण पसरवित आहेत. मतदारसंघातील त्या त्या गांवात बाहेरुन आलेल्या नागरिकांना गावात येवू नका असे कोणीच म्हणत नाही उलट त्यांच्या व त्यांच्यासोबत आलेल्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने आरोग्याची तपासणी करुन घ्या याकरीता गावकरीच आग्रही राहत आहेत.बाहेरगांवाहून आलेल्यांना पाटण मतदारसंघातील गावांमध्ये प्रवेशबंदी नाहीतर कोणी अनोळखी व्यक्ती गांवात येवू नये व कोरोनाची लागण होवू नये याकरीता गावकरी दक्षता घेत आहेत.


याचा गैरअर्थ कोणी काढू नये आणि अशाप्रकारे कोणी चुकीच्या अफवा विनाकारण समाजामध्ये सोशल मिडीयाच्या माध्यमातून पसरवित असेल तर अशा विघ्नसंतोषी व हुल्लडबाजांना गावकऱ्यांनी तसेच बाहेरगांवाहून आलेल्यांनी धडा शिकवावा असेही गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी म्हंटले आहे.