शेऱ्यातील पाटील कुटुंबाने दिला पर्यावरण संर्वधनाचा संदेश


शेऱ्यातील पाटील कुटुंबाने दिला पर्यावरण संर्वधनाचा संदेश


कराड : शेरे (ता. कराड) येथील विश्वनाथ भास्कर पाटील यांचे नुकतेच निधन झाले. बुधवारी त्यांच्या रक्षाविसर्जन वेळी जमा केलेली रक्षा कृष्णा नदीमध्ये विसर्जित न करता त्यांच्या कुटुंबीयांनी त्या आपल्या शेतात दोन खड्डयामध्ये टाकून तेथे वृक्षारोपण केले. नदीत रक्षाविसर्जन केल्यानंतर होणारे पाणी प्रदूषण रोखण्यासाठी पाटील कुटुंबाने पर्यावरण संर्वधनाचा संदेश देऊन समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.


(कै.) पाटील हे कुटुंबातील जेष्ठ सदस्य होते. त्यांचे सोमवारी (ता. 13) हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यांचे कुटुंब गावात राजकीय व सामाजिक क्षेत्रात नावाजलेले आहे. त्यांचे थोरले चिरंजीव विकास हे अमेरिकेमध्ये संगणक अभियंता म्हणून नोकरीस आहेत. तर धाकटे चिरंजीव वैभव हे कृषी पदवीधर व प्रगतशील शेतकरी आहेत. ते माऊली ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर त्यांचे पुतणे कृष्णा कारखान्याचे माजी संचालक अशोकराव पाटील व समीर पाटील यांनीही आपल्या संघटन कौशल्याच्या जोरावर त्या-त्या क्षेत्रात वेगळा ठसा उमटवला आहे.


राजकीय व सामाजिक क्षेत्रातील विधायक कार्याची परंपरा कायम राखण्यासाठी कुटुंबीयांनी (कै.) पाटील यांच्या रक्षा नदीमध्ये विसर्जित न करता त्या शेतात दोन खड्डे घेऊन त्यात टाकल्या. व त्यावर दोन फळरोपांची लागवड केली. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रक्षाविसर्जनवेळी स्मशानभूमीत गर्दी न करता सामाजिक अंतर राखण्याबरोबर यावेळी उपस्थित मोजक्याच नातेवाईकांसाठी आरोग्य विभागाच्या सूचनेनुसार हात धुण्याची वेगळी सोय ठेवून सदरचा विधी पार पाडला. पाटील कुटुंबाच्या रक्षाविसर्जन न करता वृक्षारोपण करण्याच्या त्यांच्या या पर्यावरण संर्वधनाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

(कै.) पाटील यांच्या अमेरिकेत नोकरीस असलेल्या थोरल्या मुलाने त्यांच्या पार्थिवाचे अमेरिकेतून व्हिडीओ कॉद्वारे अंत्यदर्शन घेतले. विकास पाटील यांना लॉकडाऊनमुळे वडिलांच्या अंत्यविधीस येणे शक्य नसल्याने पार्थिवाचे अंत्यदर्शन घेताना त्यांना व त्यांच्या पत्नीस दुःख अनावर झाले होते.