हेल्पलाईनवर आले 1145 फोन ; मोठ्या प्रमाणात होत आहे शंकाचे निरसन
सातारा :कोरोनाच्या संसर्गामुळे सातारा जिल्हा नव्हे तर, सारं जग हे अस्थिर झाले आहे. कोरानाच्या नियंत्रणासाठी जिल्हा लॉकडाऊन केलेला आहे. यामुळे नागरिकांना जीवनावश्यक वस्तु मिळाव्यात यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा यांच्यासह विविध यंत्रणा आपापल्यापरिने प्रयत्न करीत आहेत. शासनाने उपलब्ध करुन दिलेल्या सुविधा नागरिकांपर्यंत पोहचण्याकरिता जिल्हा प्रशासनाने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या पुढाकाराखाली 1077 ही हेल्प लाईन सुरु केली आहे, या हेल्पलाईनच्या माध्यमातून नागरिकांच्या संपर्कात राहून त्यांना सुविधेबरोबर अडचणी सोडविण्याचे काम करीत आहे. आत्तापर्यंत जवळपास 1145 लोकांचे फोन आले, त्यातील बहुतांश लोकांच्या शंकाचे निरसन करण्यात आले आहे.
रेशन पुरवठ्याची नागरिकांना अद्यावत माहिती, रेशनिंग संदर्भात तक्रार नोंदवून व त्याचे निराकरण करणे, रेशन दुकानदार फसवणूक करीत असल्यास त्याची तक्रार नोंदविणे व संबंधित अधिकाऱ्याला कळविणे, परराज्यातील कामगारांना धान्य पुरवठा करण्याबाबत , ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनाश्यक वस्तुंचा पुरवठा करण्याबाबत, अपंग नागरिकांना दैनंदिन जीववनाश्यक वस्तुंचा पुरवठा करणे बाबत अशी विविध सुविधा 1077 या हेल्पलाईनद्वारे पुरविण्यात येत आहेत. जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करण्याकरिता माहिती पुरविणे, जिल्ह्यातील नोंदणीकृत खासगी डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधून कोरोनाबधीत लोकांची माहिती फोनद्वारे व एसएमएसद्वारे घेऊन ती जिल्हा प्रशासनाला कळविण्याचे कामही या हेल्पलाईनद्वारे केले जात आहे.
172 परप्रांतीयांनी, 167 जिल्ह्यातील नागरिकांनी, 49 जणांनी नोंदणी, 29 जणांनी औषधांसाठी, 253 वाहतुकीसंदर्भात पास मिळण्यासाठी, 351 रेशनकार्ड संदर्भात, 124 इतर असे एकूण 1145 नागरिकांनी 1077 हेल्पलाईनवर संपर्क साधला आहे.
समुपदेशन राज्यातील पहिला उपक्रम
कोरोना संदर्भात घाबरुन जावू नये यासाठी जिल्ह्यातील नागरिकांना मानसिक आधार व समुपदेशन देण्याची यंत्रणा देखील प्रशासनाने चालू केली आहे. फोन कॉलद्वारे राबविण्यास सुरुवात केली केली आहे. हा राज्यातील पहिला उपक्रम आहे. यासाठी अनेक सामाजिक संस्था, दानशूर व्यक्ती यांनी शासन यंत्रणेस दिला हातभार दिला असून सातारा येथील खासगी कंपनीने देखील कॉल सेंटरचे काम हाती घेतले आहे. नागरिकांच्या काही तक्रारी व माहिती मिळण्यासाठी 1077 या हेल्पलाईन क्रमांकाचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.