कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक व खाजगी रुग्णालयात आबालवृद्धांसाठी खास कक्ष सुरु करावा - ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत
मुंबई - कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना प्रतिबंधाबाबत बैठक झाली. या बैठकीत ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी कोरोनाबाबत विशेष उपाययोजना करण्याची, वृद्ध व बालकांसाठी सार्वजनिक व खाजगी रुग्णालयात खास कक्ष सुरू करण्यास मदत करण्याची सूचना मांडली.
कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी राज्य व जिल्हा पातळीवर प्रतिनिधींचा समावेश असलेली राज्य आपत्कालीन समिती स्थापन करावी. इतर प्रकल्पावरील खर्च कमी करून तो निधी तपासणी प्रयोगशाळा व उपचार सुविधा स्थापन करण्यासाठी द्यावा. खाजगी रुग्णालयांचे सहकार्य घेऊन त्यांना अनुदान द्यावे. औषध उद्योगाला मास्क, ग्लोव्हज, संरक्षक कपडे, सॅनिटायझर्स व औषधे तयार करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार ते उपयुक्त ठरणारे असल्याचे डॉ.नितीन राऊत यांनी म्हटले.
राज्यातून इतर कोरोनाग्रस्त देशांत होणारे अनावश्यक प्रवास टाळावेत. आंतरराष्ट्रीय परिषदांतून माघार घ्यावी. यामुळे होणाऱ्या नुकसानीसाठी पर्यटन, हवाई वाहतूक कंपन्या, हॉटेल, आयात-निर्यात उद्योग यांना करदिलासा देण्यात यावा. जनजागृतीसाठी जिल्हास्तरीय शिबीरे आयोजित करावे. विमानतळावर स्क्रीनिंग मशीन बसविण्यात याव्यात, या सूचनाही मांडल्या.