पाणी शुध्दीकरणाची नैसर्गिक प्रक्रिया बंद.... नदीकाठच्या हजारो गावांना दूषित पाणीपुरवठा


पाणी शुध्दीकरणाची नैसर्गिक प्रक्रिया बंद.... नदीकाठच्या हजारो गावांना दूषित पाणीपुरवठा


कराड - कृष्णा - कोयना नदींसह उपनद्या ही दूषित होत असल्याने नागरिकांचे आरोग्य मोठ्याप्रमाणात धोक्यात येण्याच्या घटना समोर येत आहेत.ओढ्या-नाल्यात सोडले जाणारे सांडपाणी, कचरा, मलमूत्र आदी कारणांमुळे नद्यांचे पाणी दुषित होत आहे. गावोगावच्या पाणीपुरवठा संस्था नदीतील दूषित पाणीपुरवठा करीत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वाळूचा बेसुमार उपसा व मच्छीमारी या कारणांमुळे पाणी शुध्दीकरणाची नैसर्गिक प्रक्रिया बंद पडली आहे. त्यामुळे या सर्व संबंधितांवर कारवाई करण्याची मागणीने जोर धरला आहे. 


कृष्णा, कोयना व त्यांच्या उपनद्या कृष्णा, वेण्णा, उरमोडी, कुडाळी, तारळी, कोयना, केरा, नीरा, बाणगंगा, माणगंगा, येरळा, सोळशी, भिमा नदी, खेमवती कुरवली, कानदानी वाहत आहेत. नदया व उपनद्यांच्या काठाला असणार्‍या गावातून व शहरातून मिसळणार्‍या सांडपाण्यामुळे पाणी प्रदूषित होते. त्याचा मानवी आरोग्यावर परिणाम होतो आहे. नदीचे पाणी खराब, दूषित, हिरवे झालेले पहावयास मिळत आहे. नदीवरुन पाणीपुरवठा करणारी योजना हेच पाणी उचलते आणि हजारो गावे हे दूषित पाणी पिऊन गंभीर आधाराच्या गर्तेत जातात.


नदीकाठावरील गावे, शहरांचे सांडपाणी, गटर, मलमूत्रमिश्रीत पाणी, कारखान्यांचे पाणी ओढ्यातून नदीला जावून मिसळत असते, तेच पाणी पुन्हा उचलून हजारो गावांना पुरविले जाते. दूषित पाणी पिण्याशिवाय नागरिकांसमोर दुसरा पर्याय शिल्लक राहिलेला नाही. नदी, नाले, ओढे, पूल दिसले की घरातील कचर्‍यांच्या पिशव्या टाकल्या जातात. यामुळे नदी, नाले व ओढ्यातील पाणी दूषित होते. 50 ते 70 टक्के आजार हे दूषित पाण्यामुळेच होत असल्याचे दिसून येत आहेत.


वाळूला पाणी शुध्दीकरणाची नैसर्गिक देणगी आहे. नदीमध्ये असणारे मासेही पाणी शुध्द करतात. प्रशासन व नागरिक या दोन्ही बाबींकडे दुर्लक्ष करतात. प्रत्येक गावात पाणीपुरवठा करताना नदीतील पाणी फिल्ट्रेशनवरद्वारे स्वच्छ केले जाते. तेथून दुसर्‍या टाकीमध्ये सोडले जाते. पुढे क्‍लोरीन सोडून पाणी निर्जंतूक केले जाते. दरम्यान मलमूत्र मिश्रीत सांडपाणी ओढ्यातून नदीत येते.त्यातील अशुध्द पाणी बाजूला करणे शक्य नसल्याचे जाणकार सांगतात. वाळू उपसा बंद करणे व मासे वाढविणे हा उपाय आहे.


शुद्ध पाण्यासाठी जनजागृती हवी 


पाणी शुध्दीकरणाबाबत सामाजिक भान राखणे व जनजागृती करणे आवश्यक आहे. प्रशासन व नागरिकांनी दक्ष राहिले पाहिजे.पाणी दूषित करणार नसल्याचा संकल्प केला पाहिजे. प्रत्येक नागरिकाला वॉटर फिल्टर बसविणे शक्य नाही. यामुळे सर्वांनाच शुध्द पाणी मिळणेसाठी जनजागृती करून सर्वांनी दक्ष राहणे हाच एकमेव उपाय आहे.