ग्रामीण भागातील तक्रारी निवारण्यासाठी महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी बैठक होणार......ग्रामविकास विभागाचे परिपत्रक


ग्रामीण भागातील तक्रारी निवारण्यासाठी महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी बैठक होणार......ग्रामविकास विभागाचे परिपत्रक


कराड- जनता दरबार, लोकअदालत माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्याचा राज्य शासन प्रयत्न करीत असतानाच ग्रामविकास विभागाच्यावतीने महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी गटविकास अधिकाऱ्यांनी बैठक आयोजित करून ग्रामीण भागातील जनतेच्या तक्रारी सोडवण्यासाठी प्रयत्न करावा असा निर्णय घेण्यात आला आहे.


सातारा, कराड, महाबळेश्वर, वाई, माण, खटाव, फलटण, जावली, पाटण,खंडाळा तालुक्यातील गटविकास अधिकाऱ्यांनी ग्राम विकास विभागाच्या परिपत्रकानुसार कार्याआरंभ करण्याचे नियोजन केले आहे. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी सकाळी ११ वाजता गटविकास अधिकाऱ्यांनी संबंधित कार्यालयात बैठक आयोजित करण्याचे निर्देश शासन परिपत्रकाद्वारे देण्यात आले आहेत. ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी जनता दरबारच्या धर्तीवर आता अधिकाऱ्यांना देखील विशेष सूचना केल्या आहेत.


प्रत्येक शुक्रवारी होणाऱ्या या सभेत जनतेच्या तक्रारी, गाऱ्हाणी, अडचणी सोडवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या सभेबाबत ग्रामपंचायत, गटविकास अधिकारी तसेच पंचायत समितीमध्ये आलेल्या लेखी तक्रारीतील सर्व तक्रारदारांना सभेपुर्वी 8 दिवस कल्पना देण्यात येणार आहे. तसेच या सभेअंतर्गत होणाऱ्या कार्यवाहीचा तपशील संबंधित जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्याच्या सूचना देखील या परिपत्रकात करण्यात आल्या आहेत.


या परिपत्रकानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सर्व गटविकास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीचे संकलन करायचे आहे. ही संकलित माहिती विभागीय आयुक्तांकडे पाठवायची असून, महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात या सर्व माहितीचा तपशील ग्राम विकास मंत्री आणि ग्राम विकास विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांकडे सादर करायचा आहे. या परिपत्रकानुसार आता जनेतच्या प्रश्नांची सोडवणूक तातडीने होणार असून योग्य ती कार्यवाही देखील होणार आहे.