लॉकडावूनचे गांभीर्य ओळखून घराबाहेर पडू नका - नवल किशोर राम
पुणे - पुणे जिल्ह्यात बहुतांशी नागरिक लॉकडावूनला चांगल्या प्रकारे प्रतिसाद देत असून अत्यावश्यक सुविधा देणारी यंत्रणा सुरु आहे. याकाळात औषध दुकाने, किराणामाल व भाजीपाल्याची दुकाने सुरु राहणार आहेत, तथापि या वस्तूंची खरेदी करताना नागरिकांनी एक मीटर चे अंतर (सोशल डिस्टन्सिंग ठेवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले आहे.
कोरोनाच्या प्रतिबंधासाठी प्रशासन रात्रंदिवस कार्यरत असून या सेवेतील कर्मचाऱ्यांना पेट्रोल पंप चालकांनी इंधन पुरवठा करावा. तसेच शासकीय व अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनी ओळखपत्र दाखवल्यास रस्त्यात अडवू नये, अशा सूचना श्री. राम यांनी केल्या आहेत.
शेतकऱ्यांनी पीक काढणीची कामे सामाजिक शिष्टाचार पाळून व योग्य ती दक्षता घेऊन सुरु ठेवावीत. अत्यावश्यक साधनसामुग्रीची ने-आण करणाऱ्या वाहतुकदारांनी वाहनांवर स्टिकर लावावेत.
सद्यपरिस्थितीतही 5 ते 10 टक्के नागरिक कोणतेही कारण सांगून घराबाहेर रस्त्यांवर फिरताना दिसत आहेत. कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावाचे गांभीर्य ओळखून नागरिकांनी स्वतः साठी, कुटुंबासाठी आणि समाजासाठी घरी थांबावे, व प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी श्री. राम यांनी केले.