उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांची मंत्रालयातील दालनातून कामकाजाला सुरूवात...मुंबईत झालेल्या २६/११ च्या हल्ल्यात उत्तम कामगिरी बजावणाऱ्या शूर पोलीस शिपाई यांचा सत्कार
मुंबई : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना मंत्रालयातील मुख्य इमारतीमध्ये पाचव्या मजल्यावरील दालन क्रमांक ५०१ देण्यात आले आहे. या दालनाचे काम पूर्ण झाले असून आजपासून मंत्रालयातील दालनातून कामकाजाला सुरूवात केली आहे.
मंत्रालयात कामकाज सुरू झाल्यानंतर सन २००८ मध्ये मुंबईवर झालेल्या ‘२६/११’च्या हल्ल्यावेळी कर्तव्य बजावत असताना दहशतवादी अजमल कसाबकडून जखमी झालेले पोलीस शिपाई अरुण जाधव यांनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांची भेट घेतली. या प्रसंगी श्री.जाधव यांनी २६/११ च्या हल्ल्याच्या आठवणी जागवल्या.
श्री.सामंत म्हणाले, आपल्या अतुलनीय शौर्याचा महाराष्ट्राला अभिमान आहे. आपले शौर्य संपूर्ण महाराष्ट्रातील युवा पिढीला प्रेरणादायी असून आपल्या अतुलनीय साहसाबद्दल आपणास मानाचा मुजरा!, असे सांगून श्री.जाधव यांचा सत्कार करण्यात आला.
सत्कारप्रसंगी श्री. जाधव यांनी श्री. सामंत यांचे आभार मानले.