कराडकरांना मिळणार आता घरपोच अन्नधान्य भाजीपाला...मुख्याधिकारी यशवंत डांगे, पोलीस निरीक्षक बी आर. पाटील यांचा निर्णय
कराड - कराड शहरातील मुख्य भाजी मंडईत खरेदीसाठी होणारी गर्दी रोखण्यासाठी कराड नगरपालिका प्रशासनाने मंडई बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.दरम्यान कराडकर नागरिकांना आता किराणामाल व भाजीपाला घरपोच देण्याची व्यवस्था नगरपालिका प्रशासनाने केली आहे. भाजी विक्रेत्यांना रितसर पत्र देऊन प्रत्येक पेठ निहाय दोन ते तीन व्यापाऱ्यांची नेमणूक केली आहे. लोकांच्या मागणीनुसार त्यांना पुरवठा केला जाणार आहे यामुळे जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी होणारी गर्दी टाळता येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी दिली.
कराडच्या मुख्य भाजी मंडईमध्ये सकाळी आठ ते दुपारी 3 वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणात लोकांचे खरेदीला गर्दी होत असल्याचे निदर्शनास आल्याने मंडई बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.नगरपालिका प्रशासनाने मंडईमध्ये यापूर्वी बसण्यासाठी ठराविक चौकोन अंतरावर केले होते, तरीही गर्दी हटत नसल्यामुळे सदरचा निर्णय घेतला आहे. पेठ निहाय भाजी घरपोच देण्याची व्यवस्था केल्याची माहिती मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी दिली. ७ पेठांमध्ये १४ ठिकाणी १८ लोकांकडून भाजीपाल्या विक्रेत्यांची सोय केली आहे. प्रत्येक विक्रेत्याचा मोबाईल क्रमांक देवून त्यांना ऑर्डर दिल्यानंतर भाजीपाला घरपोच मिळणार आहे.
कराड शहरात तालुक्यासह अन्य भागातून अन्नधान्य आणि भाजीपाल्याची आवक व्हावी, यासाठी नगरपालिका आणि पोलिस प्रशासनाने कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या मदतीने केलेल्या प्रयत्नाला यश आले आहे. मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी बाजार समितीमधील एकता संघटनेचे उपाध्यक्ष सुरेश थोरात, व्यापारी संघटनेचे नितीन मोटे, हॉकर्स संघटनेचे जावेद नायकवडी यांच्याशी चर्चा केली आहे.
शहरातील काही पेठा मोठ्या आहेत. त्याची विभागणी करून भाजीपाल्यांचे वाटप करण्याचे नियोजन केले आहे. त्यात मंगळवार पेठेतील मुळीक पंप ते कन्याप्रशाला, सुशांतनगर परिसर, वाखाण परिसर असे भाग केले आहेत. बुधवार पेठेत शिवाजी हौसिंग सोसायटी, उपजिल्हा रूग्णालय व मुळ बुधवार पेठ आणि शनिवार पेठेत आझाद चौक ते दत्त चौक, दत्त चौकापासून कोयनादूध कॉलनी ते कोल्हापूर नाका, कार्वे नाका, मुजावर कॉलनी, सुपर मार्केट अशी विभागणी केली आहे.
अनुक्रमे परिसर, भाजीपाला विक्रेत्यांचे नाव, वाहन क्रमांक, सर्व विक्रेत्यांचे माेबाईल क्रमांक 02164 / 222237 या नगरपालिकेतील दूरध्वनी ची संपर्क करून सविस्तर माहिती देण्यात येणार आहे. दरम्यान पेठ निहाय विक्रेत्यांची यादी तयार करण्यात आली असून ती सर्वत्र सोशल मीडियाद्वारे पोचवली जात आहे.