वारंवार अपघात होणारे कराड परिसरातील आठ ब्लॅक स्पॉट
कराड - सातारा जिल्हा वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी सातारा जिल्ह्यातील अपघात स्थळे निश्चित केली आहेत. कारण या अभ्यासाअंती यापूर्वी वारंवार अपघात झालेली ६२ "ब्लॅक स्पॉट" शोधून काढलेली आहेत.या ठिकाणांवरील अपघाताचे प्रमाण पाहता अपघात होऊ नयेत, यासाठी जिल्हा पोलीस प्रशासन, जिल्हा वाहतूक शाखा उपाय योजना करीत आहेत.
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग हा सातारा जिल्ह्यातील शिरवळ (खंडाळा) ते वाठार (कराड) पर्यंत जातो. दररोज हजारो वाहनांची या महामार्गावरून ये-जा सुरू असते. यामुळे नेहमी या मार्गावर लहान-मोठे अपघात जहोत असतात. कराड तालुक्यातील पेरले फाटा, उंब्रज, कोर्टी फाटा, मलकापूर फाटा, नारायणवाडी फाटा, पाचवड, वाठार फाटा, हॉटेल वैष्णवी कराड, ही आठ ठिकाणे निश्चित करण्यात आले आहेत.अनेक अपघातामध्ये अनेकांनी जीव गमावले आहेत.यामुळे या अपघातांमध्ये बळी जाणाऱ्यांची संख्या पाहता अपघाताच्या ठिकाणांचे ब्लॅक स्पॉट शोधून काढले आहेत.तसेच या ठिकाणी अपघात होऊ नये यासाठी उपाय योजना करण्यात येत आहे.
अलीकडे अपघातामध्येही बळी जाण्याचे प्रमाण वाढलेले आहे. ही अत्यंत चिंताजनक बाब असून अनेकांचे संसार उघड्यावर पडत आहेत. यामुळे आता अपघात रोखण्यासाठी पोलिसांनी सातारा जिल्ह्यातील ६२ ब्लॅक स्पॉट शोधून काढले आहेत. वारंवार तीन वर्षांमध्ये एकाच ठिकाणी झालेल्या अपघात स्थळाला, ठिकाणाला "ब्लॅक स्पॉट" असे संबोधले जातेय. एका ठिकाणी पाचपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला असेल तर ते ठिकाण ब्लॅक स्पॉट म्हणून अधोरेखित केले आहे.
एखादी व्यक्ती अपघातामध्ये मृत्यू झाली तर हे नित्याचेच आहे. असे समजून त्याकडे कानाडोळा केला जातोय. इतकी समाजाची संवेदना आता बोथट होऊ लागली आहे. अपघातात मृत्यू पावलेल्या व्यक्तीकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले जात आहे. वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये जेवढ्या व्यक्ती मृत्यू पावल्या त्यापेक्षाही अपघातामध्ये मृत्यू होण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. ही भयावह परिस्थिती आहे. पोलिसांनी राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य मार्गावरील सातत्याने अपघात होत असलेले ब्लॅक स्पॉट शोधून काढले आहेत. यावर पोलिसांनी अहवाल तयार केला असून, हा अहवाल महामार्ग प्राधिकरण, जिल्हाधिकारी, विभागाला सादर केला आहे.
अपघात होऊ नये यासाठी दक्षता हवी
फलक, बॅरिकेट्स, रबलिंग स्ट्रीप, वळण काढून टाकणे, झाडांच्या फांद्या काढणे यासह अन्य काही महत्त्वाच्या उपाययोजना जिल्हा वाहतूक शाखेच्या अहवालामध्ये नमूद करण्यात आल्या आहेत. सदर अहवालावर प्रशासकीय पातळीवर उपाय योजना केल्या जातील. दरम्यान वाहन चालकांनी व नागरिकांनी आपल्या जीवाची काळजी घेतली पाहिजे. सतर्कता हाच सुरक्षित प्रवासाचा मूलमंत्र आहे