परदेश प्रवास केलेल्यांची माहिती सादर करण्याचे आदेश : डॉ. रविंद्र शिसवे
पुणे जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणुला जगभरात पसरलेला साथीचा आजार म्हणून घोषीत केलेले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर व देशांतर्गत कोरोना विषाणुबाधीत रुग्ण आढळत आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरुन विमान प्रवासाव्दारे प्रवासी भारतात व इतरत्र प्रवास करीत आहेत. त्यामुळे कोरोना विषाणुचे संशयित रुग्ण पुणे शहरात आढळून आलेले आहेत. यामुळे कोरोना प्रसार व संसर्ग यावर तात्काळ नियंत्रण करणे व विषाणुंच्या संसर्गात वाढ होवू न देता तात्काळ उपाययोजना करणे आवश्यक असल्याने परदेश प्रवास केलेल्यांची माहिती सादर करण्याचे आदेश पोलीस सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे यांनी दिले आहेत.
पुणे पोलीस आयुक्तालयाच हद्दीमध्ये मोठया संख्येन टूर्स ॲन्ड ट्रॅव्हल्स कंपनी, हॉटेल, लॉजेस, गेस्ट हाऊस आहेत. हॉटेल, लॉजेस, गेस्ट हाऊस मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरुन विमान प्रवासाव्दारे आलेले परदेशी नागरिक तसेच परदेशातून प्रवास करुन आलेले भारतीय नागरिक वास्तव्यास येतात. त्यामध्ये कोरोनाबाधित देशांतून प्रवास करुन आलेल्या नागरिकांना कोरोना विषाणुची बाधा झाली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. यास्तव अशा प्रवाशांची वैद्यकीय तपासणी करणे आणि तपासणीमध्ये कोरोनासदृष्य लक्षणे आढळून आलेल्या प्रवाशांना औषधोपचारासाठी विलगीकरण करणे अनिवार्य झाले आहे. सबब, पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील हॉटेल, लॉजेस, गेस्ट हाऊस यांमध्ये परदेशातून प्रवास करुन वास्तव्यास येणाऱ्या नागरिकांची माहिती प्राप्त करणे अत्यावश्यक आहे. तसेच भारत सरकार आरोग्य मंत्रालय यांनी सुचित केल्याप्रमाणे नागरिकांनी कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संपर्कात येवु नये यासाठी देशांतर्गत व परदेशी सहल आयोजित करणाऱ्या विविध टूरिस्ट व ट्रॅव्हल्स कंपनी यांच्यावर बंधन असणे आवश्यक ठरणार आहे.
पोलीस सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, यांनी पुणे शहर महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 68 अनुसार पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातील टूर्स ॲन्ड ट्रॅव्हल्स कंपनी, हॉटेल, लॉजेस, गेस्ट हाऊस यांनी रजिस्टर बनवून त्यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरुन विमान प्रवासाव्दारे वास्तव्यास आलेले परदेशी नागरीक तसेच परदेशातून प्रवास करुन आलेले भारतीय नागरिक यांच्या सविस्तर नोंदी घ्याव्यात. त्यांचेबाबतची माहिती सत्वर संबंधीत पोलीस स्टेशनला तसेच जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे यांना कळवावी. तसेच पोलीसांना सदरचे रजिस्टर माहिती ज्या ज्या वेळी पाहिजे त्या त्या वेळी उपलब्ध करुन द्यावी.
टूर्स ॲन्ड ट्रॉव्हल्स कंपनी यांनी व्यापार, औद्योगिक कारणास्तव, सुट्टी अथवा अन्य कारणास्तव समुहाच्या स्वरुपात देशांतर्गत व परदेशी सहल आयोजित करण्यावर सदर निर्देशांव्दारे मनाई करण्यात येत असून अपवादात्मक परिस्थितीत अशी सहल आयोजित करावयाची असल्यास त्यासाठी पोलीस आयुक्त, पुणे शहर यांची परवानगी घेण्यात यावी. या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय दंड विधान संहिला कलम 188 प्रमाणे शिक्षेस पात्र राहील, असेही पोलीस सह आयुक्त डॉ.रवींद्र शिसवे यांनी दिली आहे.