'विठूराया' आला धावून...मंदिर समितीकडून भुकेल्यांना अन्नदान
पंढरपूर - तीर्थक्षेत्र पंढरपूर मध्ये 300 पेक्षा अधिक भिक्षेकरी, वेडसर आणि निराश्रित लोक वास्तव्याला आहेत. भाविकांनी मदतीवर यांची उपजीविका चालत असते. जनता कर्फ्युमुळे या सगळ्या मंडळीची उपासमार होवू लागल्याने श्री विठ्ठल मंदिर समितीने विशेष पुढाकार घेवून या लोकांना जेवणाची पाकिटे उपलब्ध करुन दिली आहेत.
गेल्या दोन दिवसापासून पंढरपूर मध्ये नीरव शांतता आहे. श्री विठ्ठल मंदिर परिसर, चंद्रभागा वाळवंट, नगर प्रदक्षिणा मार्ग, रेल्वे स्टेशन, बस स्थानक आणि शहरातील मठ मंदिरासमोर या मंडळींची उठबस असते.
भाविकांनी दान केलेल्या पैशातून आणि अन्नदानातून यांच्या पोटपाण्याची व्यवस्था होत असते.मात्र दोन दिवसापासून पंढरी ओस पडल्याने भाविकांवर अवलंबून असलेल्या या लोकांची उपासमार होत असल्याचा मुद्दा उपस्थित झाला.ही उपसमार टाळण्यासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने तातडीने पुढाकार घेत या मंडळींची जेवणाची व्यवस्था केली असून त्यांना वास्तव्याला असलेल्या ठिकाणी अन्नाची पाकिटे पोहच केली जात आहे.मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सुनील जोशी, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, प्रांताधिकारी सचिन ढोले हे या नियोजनावर लक्ष ठेवून आहेत.