शेतीकामासाठी डिझेल उपलब्ध करून द्यावे - मंत्री बाळासाहेब पाटील 


शेतीकामासाठी डिझेल उपलब्ध करून द्यावे - मंत्री बाळासाहेब पाटील 


कराड - नागरिकांनी विनाकारण घराच्या बाहेर पडू नये, सर्व जीवनावश्यक वस्तूंचा साठा उपलब्ध असल्याने किराणामाल तसेच मेडिकल याठिकाणी गर्दी करु नये, प्रशासनाला सहकार्य करावे.शेतकर्‍यांना शेती कामासाठी डिझेल, पेट्रोल उपलब्ध करून द्यावे अशा सूचनाही सहकार मंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.


कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने 21 दिवस संचारबंदी लागू केली आहे. या पार्श्वभूमीवर करावयाचे उपाय योजनेसंबंधी आढावा बैठक महाराष्ट्र राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी कराड येथे घेतली.


संचारबंदीच्या काळात पेट्रोल, डिझेल पंप बंद असल्याने शेतीकामासाठी डिझेल मिळत नाही. त्यामुळे अडचण निर्माण झाली आहे. शेतीकामासाठी डिझेल उपलब्ध करून देण्याचानिर्णय घेण्यात आला असून त्यासंबंधी योग्य ते नियोजन करण्याच्या सूचना पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिल्या आहेत. तसेच संचारबंदी असून सुद्धा बाहेरील लोक हे गावात, शहरात येत आहेत. त्यांची योग्य ती चाचणी करण्यासाठी ग्रामपंचायत, नगरपालिका यांना मार्गदर्शन करावे तसेच जीवनावश्यक वस्तूंचा साठा पुरेसा असल्याने तुटवडा भासणार नाही. त्यामुळे किराणामाल, मेडिकल याठिकाणी गर्दी करू नये आदी विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली.


शासकीय विश्रामगृह कराड येथे झालेल्या बैठकीसाठी उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, पोलीस उपअधीक्षक सुरज गुरव, तहसीलदार अमरदीप वाकडे, मुख्याधिकारी यशवंत डांगे, तालुका वैद्यकीय अधिकारी स्वाती देशमुख, पोलीस निरीक्षक बी आर पाटील,आय पी धुमाळ उपस्थित होते.