कराड पोलिसांनी विनाकारण फिरणाऱ्यांच्या 40 दुचाकी केल्या जप्त
कराड - कराड शहर व परिसरात नागरीक विनाकारण फिरत आहेत. या नागरिकांवर आता कारवाई करण्यास प्रारंभ झाला आहे. कराड येथे तब्बल ४० दुचाकी जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
कोरोनाबाबत राज्य सरकारकडुन आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत त्याची अंमलबजावणी जिल्हा स्तरापासून गावपातळीपर्यंत करावे असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देत आहेत. एकमेकांचा संपर्क टाळणे हा एकमेव कोरूना ला प्रतिबंध करण्याचा उपाय असल्याने प्रत्येक आपल्या घरीच रहावे यासाठी सध्या संचारबंदी, लॉकडाऊन घोषीत करण्यात आला आहे. त्यामुळे सध्या सर्वत्र शांतता असुन रस्तेही ओस पडले आहेत.
पोलिसांनी ठिकठिकाणी बॅरीकेटींग करुन रस्ते बंद केले आहेत. त्यामुळे फारशी वाहतुक सुरु नाही. कराड शहर व परिसरात विनाकारण काहीजण फिरत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले असून पोलिस उपाधिक्षक सुरज गुरव, वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील, वाहतुक शाखेचे प्रमुख सहाय्यक पोलिस निरीक्षक विकास बडवे, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय गोडसे यांच्यासह पोलिस अधिकारी, कर्मचारी शहर व परिसरात विनाकारण फिरणाऱ्यांच्याविरोधात कारवाई करीत आहेत. विनाकारण फिरणाऱ्या तब्बल ४० जणांच्या दुचाकी जप्त केल्या आहेत. वीजय दिवस चौक, कोल्हापुर नाका, साईबाबा मंदीर ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे.