राज्य परिवहन महामंडळात दुष्काळी भागातील 1250 उमेदवारांचे चालकपदाचे प्रशिक्षण सुरु
मुंबई - राज्य परिवहन महामंडळाने दुष्काळी भागातील तरूणांना नोकरी देण्यासाठी परीक्षा आयोजित केली होती. या परिक्षेत १२ जिल्ह्यातून २४ हजार ५२६ विद्यार्थी उत्तीर्ण असून, १५ हजार ८५५ पात्र ठरले आहेत. ११ जिल्ह्यात १२५० वाहनचालक आणि वाहक पदाचे प्रशिक्षण सुरू असल्याची माहिती परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांनी विधानसभेत दिली.
दुष्काळी भागातील तरूणांना राज्य परिवहन महामंडळाच्या सेवेत सामावून घेण्यासंदर्भातील प्रश्न ॲड.आशिष शेलार यांनी उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना ॲड. अनिल परब बोलत होते.
ॲड.परब म्हणाले, राज्य परिवहन महामंडळाने फेब्रुवारी २०१९ मध्ये चालक तथा वाहक पदासाठी परिक्षा घेतली. १२ जिल्ह्यांसाठी ४ हजार ४१६ पदांसाठी ही परिक्षा घेण्यात आली होती. २४ हजार ५२६ उमेदवार परीक्षार्थी उत्तीर्ण झाले असून, १५ हजार ८५५ उमेदवार गुणवत्तेनुसार पात्र ठरले आहेत. ११ जिल्ह्यात २३७२ पैकी १२५० उमेदवारांचे चालक पदाचे प्रशिक्षण सुरू आहे. तसेच पुणे जिल्ह्यातील अंतिम यादी लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली