कोरोनाला प्रतिबंध करायचे, मृत्यूला परत पाठवायचे तर एकांतवासात राहायचे
(गोरख तावरे)
कठीण आहे. अवघड आहे, पण शक्य आहे, एकांतवासात राहणं, हेच कोरोनावर जालीम औषध आहे.काहीकाळ सर्वांशी संपर्क व संवाद बंद करून एकांतात बसुन वाचन, मनन, चिंतन केले तर आलेल्या प्रत्येक संकटावर मात करून यशस्वी होऊ शकतो.यासाठी सकारात्मक विचार केला पाहिजे.शासन व प्रशासन करीत असलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन केले पाहिजे.उगाच आपला शहाणपणा अथवा अक्कल पाजळण्यात काहीही अर्थ नाही.
अख्ख्या जगाला कोरोना व्हायरसने ग्रासले आहे.भयभीत केले आहे. यातून कोणत्याही देशाची सुटका झालेली नाही. दरम्यान या कोरोना व्हायरसला आपल्या उंबरठ्यापर्यंत अडवता येते. यासाठी प्रत्येकाने राज्य व केंद्र शासनाने केलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन केले पाहिजे. तरच कोरोनासारख्या उभ्या असलेल्या दारातील मृत्यूला आपण थोपवू शकतो. हो नक्कीच सकारात्मक विचार करून आपण कोरोनाला थोपवू शकतो.
चीनसारख्या देशाने स्वतःहून निर्माण केलेला हा विषाणू. जगामध्ये धुमाकूळ घालतो आहे. या विषाणूला प्रतिबंध करण्यासाठी अद्यापपर्यंत औषध उपलब्ध नाही. यामुळे हा विषाणू ज्याच्या शरीरामध्ये प्रवेश करेल, तो काही अंशी बरा होईल. अन्यथा मृत्यूशिवाय याला पर्याय नाही. हे सत्य नाकारता येत नाही. म्हणूनच केंद्र व राज्य सरकारने देशातील प्रत्येक नागरिकांना काही सूचना केल्या आहेत. त्याचे पालन केले तर, या महाभयंकर अशा रोगाला (आजाराला) आपण प्रतिबंध करू शकतो. एकापेक्षा अधिक व्यक्तीच्या संपर्कात न येणे अथवा आपल्या घराबाहेर न येणे, कोणत्याही व्यक्तीशी दुरान्वयानेही संबंध न येणे, हेच एक जालीम औषध सध्यातरी कोरोना व्हायरसवर आहे. वास्तविक पाहता आलेल्या संकटाचा विचार देशात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाने साकल्याने करणे अत्यावश्यक आहे. केवळ केंद्र व राज्य शासन आपल्यावर बंधन घालते म्हणून ते झुगारणे अथवा त्या सूचनांचे पालन न करणे, म्हणजे आपणहून स्वतःचा सर्वनाश करण्यासारखा भीषण प्रकार आहे. याचा सर्वसाधारण विचार देशातील प्रत्येक नागरिकाने केवळ स्वतःसाठी करणे अत्यावश्यक आहे.
चूक कोणाची शिक्षा कोणाला, याचा सध्या तरी विचार करता येत नाही. कारण समोर ठाकलेले संकट टाळण्यासाठी वरिष्ठ पातळीवर, सरकारस्तरावर केले जाणारे प्रयत्न व केल्या जाणाऱ्या सूचना तंतोतंत पाळण्याशिवाय सध्यातरी आपणापुढे कोणताही पर्याय उपलब्ध नाही. याचा साकल्याने विचार केला गेला तर नक्कीच आपण कोरोनासारख्या वायरसवर विजय मिळवू शकतो. यासाठी आवश्यकता आहे, ती देशातील सर्वांची सकारात्मकता या आजाराकडे पाहण्याचा दृष्टिकोन. आलेल्या संकटाला परतवून लावण्याची ताकद हिंदुस्थानी संस्कृतीमध्ये आहे. हा आत्मविश्वास सर्वांनी बाळगला पाहिजे. आणि सरकार करत असलेल्या सूचनांचे पालन केले पाहिजे. कोरोनाला हरवायचे या दृष्टिकोनातून कोरोनाकडे पाहिल्यानंतर याला आपण नक्कीच हरवू शकतो. एवढी आपली संस्कृती भक्कम व सक्षम आहे. यात कोणीही शंका घेण्याचे कारण नाही. फक्त देशातील तमाम नागरिकांची सकारात्मकतेचा विचार या कोरोनाला हद्दपार करू शकतो. आपण चुटकीसरशी कोरोना व्हायरसला आपल्या देशातून हद्दपार करू शकतो.फक्त प्रत्येक नागरिकांची इच्छाशक्ती हवी.
केंद्र सरकार व राज्य सरकार देशातील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सातत्याने गांभीर्याने विचार करून उपाय योजना करीत आहेत. त्याची अंमलबजावणी देशातील नागरिकांनी करावी, यासाठी सातत्याने विविध माध्यमांद्वारे सूचना करीत आहेत. त्याचे पालन करणे एवढेच देशातील नागरिकांच्या हातामध्ये आहे. ते केल्यानंतर आपले हीत अथवा आपला पुढील जीवनाचा प्रवास हितकारक, सुखकारक होणार हे मात्र निश्चित. "हम होंगे कामयाब" याप्रमाणे सध्या केंद्र व राज्य शासन प्रयत्न करीत आहे. त्याला श्रीकृष्णाच्या करंगळी प्रमाणे जनतेने फक्त साथ द्यावी, म्हणजे यात आपण नक्कीच यशस्वी होऊ. ताकदीपेक्षा युक्तीला महत्त्व आहे. सध्या हिंदुस्थान आपल्या युक्तीचा पुरेपूर वापर करून देशातील जनतेच्या हिताचा विचार करून काम करीत आहे. केवळ जनतेने हिंदुस्तानी सरकारच्या "हो ला हो" म्हणणे गरजेचे आहे.कारण "अति शहाणा त्याचा बैल रिकामा" अशी परिस्थिती होऊ नये, यासाठी जनतेने सरकारच्या प्रत्येक सूचनांचे पालन करावे. मग पहा हिंदुस्तानमध्ये कसा चमत्कार होतो.
समुद्राच्या मध्यभागी जहाज असल्यानंतर दुर्घटना घडली तर प्रथम त्यातून बाहेर पडतात ते उंदीर. यामुळे नागरिकांनी उन्दराची भूमिका न करता, सिंहासारखे एकटेपणाने राहण्याची मानसिकता ठेवली पाहिजे. प्रत्येकांनी स्वतः व स्वतःच्या कुटुंबाबरोबर येणाऱ्या कालावधीमध्ये एकांतवासात राहिले पाहिजे. म्हणजे येणारा काळ हा आपणासाठी आनंददायी असणार आहे. यासाठी जगातील कोणत्याही विद्वान व्यक्तीच्या अथवा भविष्यवेत्त्याची गरज भासणार नाही. "ऐ क्या कर दिया हिंदुस्तानने" असे अख्खे जग तोंडात बोट घालेल. चला तर मग आपली जगात सर्वश्रेष्ठ असणारी संस्कृती दाखवून देऊ आणि मी व माझे कुटुंब सुरक्षित राहू. यासाठी येणाऱ्या काळात एकांतवासात राहू, घरात एकटे राहू, कोणत्याही व्यक्तीशी अथवा समुहाशी संबंध येऊ देणार नाही अशी मनाची खूणगाठ बांधू.