तृतीयपंथी हक्क  परिसंवादात निर्धार "मोकळेपणाने बिनधास्त बोलु आणि लढु सुध्दा"


तृतीयपंथी हक्क  परिसंवादात निर्धार "मोकळेपणाने बिनधास्त बोलु आणि लढु सुध्दा" 


कोल्हापूर -"बिनधास्तपणे बोला, व्यक्त व्हा आणि संघर्ष करा" असा निर्धौर किर्लोस्कर ऑइल इंजिन्स संवेदना सामाजिक बांधिलकी उपक्रम कोल्हापूर जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक, एनपीएन प्लस , मैत्री अभिमान संघटना आणि  ह्युमन राईटस् नेटवर्क यांच्या संयुक्त विद्यमाने "तृतीयपंथी व्यक्तींचे हक्क आणि भारतीय कायदे" या विषयावर  चर्चासत्रात व्यक्त  करण्यात आला. 


या चर्चासत्रामध्ये विकी शिंदे, मयुरी आळवेकर, सायरा खानवेलकर, विशाल पिंजानी, साधना झाडबुके या सर्वांनी विषयाची सविस्तर आणि मुद्देसुद मांडणी केली. 
या लोकांच्या मानसिक, शारीरिक व्यथा, त्रास, कुटुंबाकडून, समाजाकडून अवहेलना कशा प्रकारे केली जाते हे विषद केले. 
या अल्पसंख्याक लोकांच्या व्यथा, वेदना ऐकून कुठल्याही संवेदनशील माणसाचं मन हेलावून जाईल, अशा प्रकारचे अनेक यातनामय अनुभव चर्चेत भाग घेतलेल्या उपस्थितांनी कथन केले.


मेडिकल सायन्स आणि मानसशास्त्रानेही समलिंगी आकर्षण किंवा ट्रान्सजेंडर असणे ही विकृती किंवा मानसिक रोग नसून ती एक सामान्य गोष्ट आहे, हे मान्य केले आहे. अलीकडेच संसदेत पारीत झालेल्या ट्रान्सजेंडर कायद्यानेही याला मान्यता दिली असली तरी, तो कायदा अपुरा आणि या अल्पसंख्याक लोकांच्या मूलभूत हक्कांवर काही बाबतीत गदा आणणारा आहे. तसेच या व्यक्तींबाबत समाजाच्या सर्वस्थरावर जाणीवजागृती होणे गरजेचे आहे असे मत प्रा.साधना झाडबुके यांनी व्यक्त केला.


"लैंगिकतेबाबत भारतीय समाज नको इतका नैतिकतेत आणि अशास्त्रीय गोष्टींमध्ये अडकला आहे. तसेच भारतीय समाजमन हे दुहेरी सामाजिक स्तरावर (double standard)जगत असून ज्याने त्याने आपापल्या सोयीने नैतिकतेचा आणि इतर सामाजिक प्रथा-परंपरांचा अर्थ लावला आहे. म्हणूनच चोरून काहीही चाळे करणार, पण लैंगिकतेबद्दल मोकळेपणाने बोलणार नाही अशी सर्वसाधारण मानसिकता आहे, ती समुळ बदलावी अशी अपेक्षा मयुरी आळवेकर यांनी व्यक्त केली. 


विकी शिंदे यांनी सांगितले, आम्ही समाजाला दिवसा नको असतो; पण अंधार पडला की कित्येकांना आम्ही उपभोगायला हवे असतो. हा अनुभवच समाजाच्या मानसिकतेची ओळख करून देणारा आहे. तृतीयपंथी म्हणजे फक्त उपभोग्य वस्तू किंवा टिंगल करण्याचा विषय असा एक सामूहिक समज आहे. खरी विकृती आहे, ती आपल्या विचारात आणि आचरणातही. पण आपण बदनाम मात्र तृतीयपंथीयांना करतो. नकारात्मक मानसिकतेतून आपण बाहेर येऊन शास्त्रीय विचार करायला हवा. 


या सर्व लोकांना प्रथम एक 'माणूस' म्हणून स्वीकारणे फार गरजेचे आहे. कुटुंबाने यांना स्वीकारण्यासाठी अशा व्यक्तींच्या कुटुंबांचे समुपदेशन होणे गरजेचे आहे. त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांना आधार देणे, या विषयावर मोकळेपणाने चर्चा, संवाद होणे गरजेचे आहे. जेणेकरून या लोकांचे जगणे सुसह्य होईल, ते मुख्य प्रवाहात माणूस म्हणून जगतील असा आशावाद सायरा  खानवेलकर यांनी समारोपात व्यक्त केला.