गडकिल्ल्यांवर जाताना....वेडे धाडस करू नका, जीवन अनमोल आहे..... पत्रकार चंद्रजीत पाटील यांचे आवाहन
गेली महिनाभर अन्नछत्रचे साहित्य आणि महाशिवरात्री निमित्त खिचडी प्रसाद तसेच महाशिवरात्रीनंतर दुसऱ्या दिवशी उपवास सोडण्यासाठी केल्या जाणाऱ्या महाप्रसादाचे साहित्य पायथ्यापासून गडावर पोहच करण्यामुळे आलेला थकवा सर्व कार्यक्रम व्यवस्थित पार पडल्यानंतर शनिवारी दूर झाला होता. त्यामुळे रविवार, 23 फेब्रुवारीला सकाळी जरा उशिरा म्हणजे सात वाजता राहुल जाधव, उमेश भोसले, संदीप मुळीक, डॉक्टर योगेश कुंभार, पकंज पांढरपट्टे, आबासाहेब लोकरे, उमेश डुबल, अभिजित क्षीरसागर, किरण पळसे, प्रथमेश आणि मी असे सर्वजण किल्ले सदाशिवगडावर पोहचलो. तर गडावर काम असल्याने बापू तिरमारे, आनंदराव गुरव, पांडुरंग भोई हे रात्री गडावरच मुक्कामी होते.
सदाशिव गार्डनमधील झाडांना पाणी घालणे, मोटर विहिरीत सोडणे यासारखी कामे करून राहुल जाधव, उमेश भोसले, प्रथमेश आणि मी गडावरून निघण्यासाठी दुपारी 1 वाजता निघालो. तत्पूर्वीच बाकीचे सहकारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास गड उतरून गेले होते. औंध येथील दोन युवक सदाशिवगड पाहण्यासाठी आले होते. तेही आमच्या पुढेच होते. उमेश त्यांच्या मागोमाग पायरी मार्गालगतच्या ध्वजापर्यंत पोहचले होते. तर आम्ही मंदिरात पाणी पिण्यासाठी पाच मिनिटे थांबलो होतो. आम्ही ध्वजापर्यंत जात असतानाच उमेश सँक ध्वजाजवळ ठेऊनच बाबरमाचीच्या बाजूला असलेल्या दरीत उतरताना दिसला. ध्वजाजवळ गेल्यावर एक व्यक्ती आणि त्यांच्या सोबत असलेला युवक आमची मुले दरीत अडकली आहेत, असे म्हणत राहुल, प्रथमेश आणि माझ्याकडे धावला. घटनेचे गांभीर्य ओळखून प्रथमेश झटकन रोप आणण्यासाठी मंदिराकडे गेला. तर मी दरीत उतरण्यासाठी पुढे धावलो. पण गवत व तीव्र उतार यामुळे पाय घसरत होते. तोपर्यंत राहुल पायरी मार्गाकडून जाता येते का ? हे पाहण्यासाठी गेला होता.
तर प्रथमेश धावतच रोप घेऊन आला आणि त्याच्यासोबत आनंदराव गुरव, बापू तिरमारे हेही आले होते. मात्र मुले तीनशे फूट दरीत अडकल्याने उमेश जीव धोक्यात घालून दरीत उतरण्याचा प्रयत्न करत होता. धोका पाहून मी, प्रथमेश आणि आनंदराव गुरव तिघांनी रोप धरून उभे राहण्याचे ठरवत बापू तिरमारे यांच्या कमरेस रोप बांधून दरीत सोडले. तोपर्यंत उमेश दरीत अडकलेल्या मुलांपर्यंत पोहचला होता. बापूही कमरेची दोरी घट्ट असल्याची खात्री करत मुलापर्यंत पोहचला होता. तर दुसऱ्या बाजूने पांडुरंग भोई हे दरीला सुरूवात होण्याच्या मार्गावर पोहचले होते. मुले ज्या ठिकाणी अडकले होते, त्या ठिकाणाहून खाली उतरणे अथवा वर जाणे खूपच धोक्याचे होते. त्यामुळे त्यानंतर पुढील पाच मिनिटे आमची सर्वांची अक्षरशः अग्निपरीक्षाच झाली. एक मुलगा घाबरला होता. त्याला समजावत आणि गोड बोलून रस्सीला धरण्यास सांगत दरीतून वर आणण्यासाठी प्रयत्न सुरु होते.
त्याच्यापाठोपाठ बापू दुसऱ्या मुलास तर उमेश, पांडुरंग भोई हे मुलांना धीर देत तर कधी त्यांचा हात पकडत गडावर आणत होते. दहा मिनिटांच्या या थरारनाट्यानंतर दोन्ही मुलांना दरीतून सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. पण तोपर्यंत आनंदराव गुरव, प्रथमेश आणि माझ्या अक्षरशः कच पडले होते. तर उमेश, बापू यांच्या शरीरावर झाडांच्या फांद्या लागून ओरखडे पडले होते. दोन महिन्यांपूर्वी सह्याद्रीची घोरपड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सावंत सर आणि शिवजयंती दिवशी हडसर किल्ल्यावर एका दिदीसोबत घडलेल्या घटना सरकन डोळ्यासमोर आल्या आणि आम्हा सर्वांचा थरकाप उडाला होता. मात्र मुले सुखरूप बाहेर काढण्यात यश आल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला होता.
त्यानंतर मुले गडावर सुखरूप आल्यानंतर त्या पित्याने आम्हा सर्वांचे आभार मानले. मात्र आभार मानायचे असतील सदाशिवाचे माना, आमचे नको असे म्हणून आम्ही गडावरून खाली उतरलो. तर त्या सुदैवी मुलांना घेऊन आनंदराव गुरव मंदिराकडे गेले. म्हणून कोणत्याही गडावर जाताना गडावर जाणाऱ्या मार्गांची माहिती घ्या. विनाकारण वेडे धाडस करून आपला व आपल्या सहकाऱ्यांचा जीव धोक्यात घालू नका. मागील आठवड्यातही एक गडप्रेमी नागरिक दरीत अडकला होता. पांडुरंग भोई यांनी प्रयतनांची शर्थ करून त्यांना बाहेर काढले होते. अनुभवापासून धडे घेत वेडे धाडस करू नका. जीवन अनमोल आहे, हे लक्षात ठेवा.
चंद्रजित पाटील,
सदाशिवगड मावळा प्रतिष्ठान, कराड.