स्वकर्तुत्वाने राजकारणाच्या पटलावर यशस्वी झालेले कराडकरांचे अशोकराव पाटील उर्फ दादा
काँग्रेस पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता, कराड शहराच्या विकासाचे स्वप्न पाहणारा नगरसेवक, दिन-दलितांचे अश्रू पुसण्यासाठी नेहमी एक पाऊल पुढे असणारे अशोकराव पाटील ( दादा) यांचा आज वाढदिवस. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा व कार्याचा घेतलेला आढावा....... - गोरख तावरे
स्वकर्तुत्वावर समाजामध्ये आपले वेगळे स्थान निर्माण करणे हे वाटते तितके सोपे काम नाही. यासाठी बराच संघर्ष करावा लागतो आणि हा संघर्ष करण्याची मानसिकता असणारे जीवनात यशस्वी होतात, असेच व्यक्तिमत्त्व अशोकराव पाटील उर्फ दादा यांचे आहे. वडिलार्जित शेती व्यवसाय करण्यापेक्षा समाजामध्ये वेगळे काही करण्याची जिद्द असणारे अशोकराव पाटील यांनी महाविद्यालयीन जीवनापासूनच राजकारणाला सुरुवात केली. महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत असतानाच टॅक्सीचा व्यवसाय केला.आपल्या बरोबर असणाऱ्या तरुण कार्यकर्त्यांबरोबरच राजकारणाचा श्रीगणेशा केला. कराड नगरपालिकेच्या राजकारणात तत्कालीन परिस्थितीत संघर्ष करण्याची मानसिकता ठेवूनच अशोकराव पाटील राजकारणाच्या मैदानात उतरले. विशेष म्हणजे राजकारणात अशोकराव पाटील यशस्वी झाले. दरम्यान मध्यंतरीच्या काळामध्ये बिकट वाटेने ही त्यांना वाटचाल करावी लागली. मात्र मनोधैर्य सक्षम करून त्यांनी ही वाट पार केली.
अशोकराव पाटील यांच्याबरोबर तत्कालीन परिस्थितीमध्ये माधवराव पवार, हणमंतराव निर्मळ, प्रतापराव भोपते, सूर्यवंशी यांच्यासह अनेक सहकाऱ्यांचा नगरपालिकेत राजकीय गट होता.सार्वजनिक जीवनात पाऊल ठेवताना आणि काँग्रेस पक्षावर प्रचंड निष्ठा असणाऱ्या अशोकराव पाटील यांनी युवक काँग्रेसपासून त्यांनी पक्षात काम केले आहे. युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी उल्लेखनीय काम केले आहे. प्रियदर्शनी नागरी सहकारी पतसंस्था निर्माण केली."प्रियदर्शनी"च्या माध्यमातून समाजातील गोरगरीब होतकरू तरुणांना उद्योगासाठी कर्जपुरवठा केला. स्वर्गीय इंदिरा गांधी यांना "प्रियदर्शनी" असे संबोधले जायचे हेच नाव घेऊन अशोकराव पाटील यांनी पतसंस्थेची संलग्न असणाऱ्या अनेक संस्था "प्रियदर्शनी" या नावानेच उभ्या केल्या. काँग्रेसचे तत्कालीन मंत्री रणजित देशमुख यांचेसोबत अशोकराव पाटील यांचा मित्रत्वाचा ऋणानुबंध सर्वपरिचित आहे. प्रियदर्शनी उद्योग समूहाचे संस्थापक म्हणून आजही अशोकराव पाटील कराड शहराला परिचित आहेत.
स्वर्गीय प्रेमलाकाकी चव्हाण, स्वर्गीय आदरणीय पी.डी. पाटीलसाहेब, अर्बन कुटुंब प्रमुख स्व. द.शि. एरम, सुभाषराव जोशी, यांच्याबरोबर अशोकराव पाटील यांनी समाजकारण, राजकारणात, बँकिंग क्षेत्रामध्ये काम केले आहे.दीर्घकाळ नगरपालिका राजकारणात सत्तेत राहण्याचा प्रदीर्घ अनुभव असणारे अशोकराव पाटील सत्तेत नसताना ही शांतपणे नगरपालिकेचा कारभार कसा चालतो, हे त्रयस्थपणे सर्व पाहत असतात. समाजकारणाबरोबर राजकारण करण्याची गोडी निर्माण झाल्यानंतर अशोकराव पाटील यांनी सहकार, क्रीडा, सामाजिक, बँकिंग अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय व कौतुकास्पद काम केले आहे. कराड शहर व तालुक्यातील कष्टकरी आणि छोटे-मोठे व्यवसाय करणाऱ्यांच्या पाठीशी ठामपणे अशोकराव पाटील पाटील नेहमीच खंबीरपणे उभे राहत असतात. श्रमिक, दलित, कष्टकरी घटकाला अडचण निर्माण झाली तर ते अशोकराव पाटील यांच्याकडे आशेने पाहत असतात अथवा त्यांच्याकडे आपली समस्या घेऊन जातात आणि ते सोडवण्यासाठी विनंती करतात.मग मात्र अशोकराव पाटील यांच्यामधील चळवळी कार्यकर्ता जागा होतो आणि प्रश्न सोडवण्यासाठी ते कसोशीने प्रयत्न करतात. म्हणूनच अशोकराव पाटील उर्फ दादा म्हणून ते सर्वश्रुत आहेत. अशोकराव पाटील यांना "दादा" म्हणून समाज आदरपूर्वक गौरवाने सन्मान करीत आहे.
कराड नगरपालिकेच्या पहिल्या महिला नगराध्यक्ष म्हणून सौ. अर्चना अशोकराव पाटील यांना मान व सन्मान मिळालेला आहे. सौ. अर्चना पाटील या अशोकदादा यांच्या अर्धांगिनी. नगराध्यक्षपदाच्या कार्यकाळामध्ये अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले गेले. याचे श्रेय अशोकराव दादांना निश्चित द्यावे लागतील. सातारा जिल्हय़ात नगराध्यक्षांची संघटना आणि माजी नगरसेवकांची संघटना स्थापन केली गेली आहे. यासाठी अशोकदादांनीच पुढाकार घेतलेला आहे. "कराड जिल्हा व्हावा" ही पहिल्यांदा मागणी जर कोणी केली असेल तर अशोकराव पाटील यांनीच. गतकाळात कराड जिल्ह्यासाठी अशोकराव पाटील यांनी अनेक प्रकारचे प्रयत्न केले. तत्कालीन परिस्थितीमध्ये केलेल्या आंदोलन, चळवळीबाबत यांच्याकडे वृत्तपत्रांची कात्रणे आहेत.कराड नगरपालिका, पंचायत समितीमध्ये कराड जिल्हाबाबत ठराव करण्यासाठी अशोकराव पाटील यांनी पुढाकार घेतला होता.
"प्रियदर्शनी"संस्था अंतर्गत असणाऱ्या सर्व संस्थांमधून अनेकांना रोजगार मिळवून दिला आहे.शिवाजी क्रीडा मंडळ स्थापना अशोकराव पाटील यांनी केले आहे. याच माध्यमातून अनेक खेळाडू जिल्हा व राज्यस्तरावर निर्माण झाले आहेत. MH50 म्हणून कराडला नवीन ओळख निर्माण झाली आहे. वास्तविक याचा मागोवा घेताना एक गोष्ट प्रकर्षाने उल्लेख करावा लागेल, तो म्हणजे वाहनधारकांच्या सोईसाठी आरटीओ कार्यालय कराडला व्हावे, यासाठी सातत्याने अशोकराव पाटील यांनी प्रयत्न केला आहे. स्वस्त धान्य दुकानदार संघटना, रिक्षा मालक चालक संघटना, सहा सीटर रिक्षा चालकांचे प्रश्न सोडवण्यासाठी अशोकराव पाटील अग्रक्रमावर असतात. शांतता समिती बैठक, गणेशोत्सवाचे नियोजन, कायदा व सुव्यवस्था, कोणतेही तंटे यामध्ये हिरिरीने भाग घेऊन गावात शांतता सुव्यवस्था राहावी. कोणताही कटू प्रसंग निर्माण होऊ नये. यासाठी योगदान देत असतात. अशोकराव पाटील प्रथम 1985 मध्ये नगरसेवक झाले. यानंतर त्यांनी कराड शहरासह तालुक्याच्या राजकारणात सहभाग घेतला.
अशोकराव पाटील यांनी राजकारणातील अनेक चढउतार पाहिले आहेत.माजी मुख्यमंत्री व दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण, कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सहकारमंत्री, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, यांच्यासह कराड नगरपालिकेतील नगरसेवक, कराड शहर व तालुक्यातील छोट्या-मोठ्या संस्थांचे पदाधिकारी, यांच्याबरोबर अशोकराव पाटील यांनी मित्रत्वाचा ऋणानुबंध कायम ठेवला आहे. प्रियदर्शनी संस्था समूहाचे प्रमुख म्हणून अशोकराव पाटील आजही अनेक क्षेत्रात कार्यरत आहेत.समाजातील सर्व घटकांना समान न्याय मिळाला पाहिजे. सर्वांचा आर्थिक उत्कर्ष झाला पाहिजे. या दृष्टिकोनातून अशोकराव पाटील आजही मोठ्या उत्साहाने काम करतात.अशोकराव पाटील उर्फ दादा हे कराड शहरातील हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. समाजातील दुर्लक्षित वर्गासाठी आजही ते काम करत आहेत.
22 फेब्रुवारी रोजी अशोकराव पाटील उर्फ दादा यांचा वाढदिवस असल्यामुळे या वाढदिवसानिमित्त त्यांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.... अभिष्टचिंतन...!