गरीब व गरजू व्यक्तींनी सवलतीच्या दरातील भोजनाचा लाभ घ्यावा - पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचे आवाहन.......शिवभोजन योजनेचा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते शुभारंभ
सातारा (जिमाका) - राज्य शासनाची महत्वाकांक्षी असणारी शिवभोजन योजना सातारा जिल्ह्यात यशस्वी करण्यासाठी शिवभोजन योजनेचा शुभारंभ पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते सातारा येथील एसटी कँटीन येथे करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदिप विधाते, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, तहसीलदार आशा होळकर, जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा देवकाते, विभाग नियंत्रक सागर पळसुदे आदी उपस्थित होते.
शुभारंभ प्रसंगी पालकमंत्री श्री. बाळासाहेब पाटील म्हणाले, सातारा जिल्हयात मुख्यालयाचे ठिकाणी प्रायोगिक तत्वावर शिवभोजन एस.टी. कँटीन सातारा, जिल्हा परिषद ऑफिस कँटीन सातारा, बेंद्रे स्नॅक्स मोती चौक राजवाडा व क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथे आज पासून शिवभोजन योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेची व्याप्ती पाहून तालुकापातळीवरही ही योजना राबविण्यात येईल. सातारा एसटी कँटीनमध्ये शिवभोजन योजना सुरु करण्यात आली आहे. एसटी महामंडळाने याच्या यशस्वीतेकडे लक्ष द्यावे. योजनेविषयी काही अडचणी असतील तर त्या मांडाव्यात, त्या निश्चीतपणे सोडविण्यात येतील. प्रति दहा रुपये प्रमाणे थाळी भोजन उपलब्ध करुन देण्यात येणार असून जास्तीत जास्त गरीब व गरजू व्यक्तींनी सवलतीच्या दरातील भोजनाचा लाभ घेवून ही योजना यशस्वी करावी, असे आवाहन पालकमंत्री श्री. बाळासाहेब पाटील यांनी केले.
प्रास्ताविकात जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा देवकाते यांनी शिवभोजनयोजनेविषयी माहिती दिली. बेंद्रे स्नॅक्स मोती चौक राजवाडा येथे शिवभोजन उद्घाटन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमानंतर 1942 च्या चले जाव चळवळीच्या स्मारकाला पालकमंत्र्यांनी भेट दिली. आणि या स्मारकास अभिवादन केले.