कराड (राजसत्य) - राज्याचे नगरविकास मंत्री, शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे हे यांनी आपल्या मुळगावी दरे (महाबळेश्वर) या गावास भेट दिली. येथील आपल्या निवासस्थानी त्यांनी जिल्हय़ातील 9 नगरपालिका व 7 नगरपंचायतींच्या कामकाजाचा आढावा त्या त्या मुख्याधिकाऱयांकडून घेतला. स्वच्छ सर्वेक्षणमध्ये जिल्हय़ातील नगरपालिका व नगरपंचायतींनी चांगले काम केले आहे. 2020 सालच्या स्पर्धेतही जिल्हय़ाचे अग्रस्थान कायम ठेवा, अशा सूचना त्यांनी मुख्याधिकाऱयांना केल्या.
जिल्हा प्रशासन अधिकारी रवी पवार, सातारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी शंकर गोरे, कराडचे मुख्याधिकारी यशवंत डांगे, फलटणचे प्रसाद काटकर, पाटणचे अभिषेक परदेशी, महाबळेश्वर पाचगणीच्या अमिता दगडे, वाईच्या विद्या पोळ यांच्यासह सर्व मुख्याधिकारी यावेळी उपस्थित होते. मुख्याधिकाऱयांतर्फे शंकर गोरे यांनी नामदार एकनाथ शिंदे यांचा सत्कार केला. सातारच्या नगराध्यक्षा माधवी कदम याही उपस्थित होत्या.
एकनाथ शिंदे यांनी सातारा, कराड, फलटणसह सर्व नगरपालिकांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा उपस्थित मुख्याधिकाऱयांकडून घेतला. नगरपालिकांचे मंत्रालय पातळीवर प्रलंबित प्रस्ताव काय आहेत, याचीही माहिती घेतली. मंत्रालयातही प्रत्येक नगरपालिकेसंदर्भात बैठक लावून प्रलंबित प्रश्न सोडवण्याची ग्वाही त्यांनी दिली. नगरपालिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मदत करण्याचे आश्वासनही दिले.
स्वच्छ सर्वेक्षण 2020 ला सामोरे जाण्यासाठी जिल्हय़ातील नगरपालिकांनी काय तयारी केली आहे, याची माहिती त्यांनी घेतली. प्रत्येक शहरातील कचरा संकलन, वर्गीकरण, प्रक्रिया याची माहिती संबंधित मुख्याधिकाऱयांकडून घेतली. यातील त्रुटी दूर करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. गत दोन वर्षातील स्पर्धेत सातारा जिल्हय़ातील नगरपालिकांनी चांगली कामगिरी केली होती. त्याचप्रमाणे यावर्षीच्या स्पर्धेतही नगरपालिकांनी चांगली कामगिरी करून दाखवावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यावर्षीही कराड देशात प्रथम यावे
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी, 2019 सालच्या स्पर्धेत कराड नगरपालिकेने 1 लाख लोकसंख्येच्या आतील शहरांमध्ये देशात प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल कराड नगरपालिकेबद्दल प्रशंसोद्गार काढले. मुख्याधिकारी यशवंत डांगे यांच्याकडून यावर्षीच्या तयारीची माहिती घेतली. यावर्षीही कराडने आपला प्रथम क्रमांक कायम राखावा, अशा शुभेच्छा दिल्या. कराडमधील उपक्रमांची पाहणी करण्यासाठी यशवंत डांगे यांनी शिंदे कराड भेटीचे निमंत्रण दिले.